मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. आर. अंतुले यांचं आज निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८५ वर्षांचे होते.
अंतुले मागील काही दिवसांपासून किडनीच्या विकारानं त्रस्त होते. त्यामुळं गेल्या महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र अत्यवस्थ असलेल्या अंतुलेची प्राणज्योत आज मालवली.
यूपीए-१च्या काळात अंतुले यांच्याकडे केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण त्यानंतर अंतुले सक्रीय राजकारणात नव्हते. त्यांच्या निधनामुळं राजकीय वर्तुळात शोक व्यक्त होत आहे.
आणीबाणीच्या काळात एकाकी पडलेल्या इंदिरा गांधी यांना अंतुलेनी मोलाची साथ दिली होती. १९८० ते १९८२ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदही भूषवलं होतं. अल्पसंख्यांक समाजातील पहिले मुख्यमंत्री म्हणून ते ओळखले जात होते. लोकहितासाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या होत्या. एक उत्तम प्रशासक आणि खंबीर नेतृत्व गमावलं, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.