मुंबई : भाजप आणि शिवसेनेची 25 वर्ष जुनी युती भाजपकडून तुटल्याचे संकेत देण्यात आले आहेत. घटस्थापनेच्या दिवशीचं युतीचा घटस्फोट होत असल्याचं चित्र आहे. अखेर पंचवीस वर्षापूर्वीची युती तुटल्याचे संकेत भाजपने दिले आहेत.
शिवसेनेशिवाय आमच्यासोबत असलेल्या घटकपक्षांसोबत आम्ही मार्गक्रमण करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यावरून युती आणखी अबाधित राहिलं असं वाटत नाही, पण युती तुटली असं स्पष्टपणे बोलतांना कुणीही दिसून आलेलं नाही.
भाजपने युती तुटल्याचे संकेत दिल्यानंतर शिवसेना आणि मित्र पक्षांसोबत आम्ही नेहमी राहू, आम्ही शिवसेनेवर कधीही टीका करणार नाहीत, असंही भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आरपीआयशी आमची चर्चा चालू असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शिवसेनेची चर्चा आकडे आणि सीएमपदाभोवती फिरत असल्याचं चित्र होतं, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
यावेळी भाजप नेते एकनाथ खडसे बोलतांना म्हणाले, आदरणीय बाळासाहेब ठाकरे, आदरणीय प्रमोद महाजन, आदरणीय गोपीनाथराव मुंडे या तीनही सहकाऱ्यांनी 25 वर्षापूर्वी शिवसेना आणि भाजपची युती निर्माण केली. 1989 साली पहिली निवडणूक युतीच्या माध्यमातून लढवली आणि आजपर्यंत यश मिळत आलं. आता महायुतीच्या माध्यमातून लोकसभेत घवघवीत यश मिळालं.
दुर्देवाने हे तीनही नेते दिवंगत झाले. गोपीनाथ मुंडे साहेबांनी या युतीचं रूपांतर महायुतीत केलं, लोकसभेत आम्हाला चांगलं यश मिळालं, 1989 पासून आतापर्यंत या निवडणुकीच्या चढ उताराचा मी साक्षीदार असल्याचं भाजप नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.