www.24taas.com,मुंबई
एसटी कर्मचा-यांनी येत्या १७तारखेला पुकारलेल्या संपाला मनसे परिवहन सेनेनं विरोध केलाय. एसटीमधल्या मान्यताप्राप्त कर्मचारी संघटना कर्मचा-यांची दिशाभूल आणि फसवणूक करत असल्याचा आरोपही मनसे परिवहन संघटनेनं केलाय.
यासंदर्भात परिवहन सेनेच्या पदाधिका-यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तसंच टोलमधून एसटीला वगळ्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीही ही मागणी तत्वतः मान्य केल्याचा दावाही त्यांनी केलाय.
एसटी कामगारांच्या वेतनात समाधानकारक वाढ न झाल्यास गणेशोत्सव आणि दिवाळीत कामगार संपावर जातील,असा इशारा एसटी कामगार संघटनेने दिला आहे.
एसटीच्या कामगारांसाठी चांगला वेतन करार सहा महिन्यांत करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी २५ मार्च २०१२ला दिले होते. पण वेतनात वाढ करण्यासाठी एसटीची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण प्रशासनाकडून पुढे केले जात आहे. वेतन करारासाठी सरकारला दिलेली सहा महिन्यांची मुदत सप्टेंबरला संपत आहे.
गेल्या चार महिन्यांत वेतनवाढीबद्दल फार काही झालेले नाही व येत्या दोन महिन्यांत ते होईल असेही वाटत नाही. त्यामुळे आम्ही गणेशोत्सव व दिवाळीच्या कालावधीत संप करू. गणेशोत्सवात अचानकपणे काम बंद आंदोलन करण्यात येईल, असे कामगार संघटनेने स्पष्ट केले आहे.