मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं तिची प्राणज्योत मालवली. मुंबईतल्या डोंगरी भागातील हबीबा हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं.
हसीना पारकर मुंबईतच राहायची. हसीना दाऊद इब्राहिमची सर्वात जवळची बहिण होती. हसीना आपल्या भावाप्रमाणे अनेकदा चर्चेत राहिली.
सतत वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या हसीना पारकर मुंबईतील नागपाडा भागात राहत होती. १९९१ साली हसीनाचा पती ईस्माईल पारकर याची गवळी गँगच्या सदस्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. बहिणीच्या पतीच्या हत्येचा सूड घेण्यासाठी दाऊद इब्राहिमनं जेजे हत्याकांड घडवून आणलं होतं. १९९२ साली जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाऊदच्या साथीदारांनी केलेल्या गोळीबारात गवळी टोळीचा शार्प शूटर शैलेश हळदणकरचा मृत्यू झाला. त्यात दोन पोलीस हवालदारही ठार झाले होते.
'लेडी डॉन' म्हणूनही होती ओळख!
वादग्रस्त व्यक्तीमत्व असलेली हसीना परकारविरुद्ध मुंबई पोलिसांमध्ये अनेक तक्रारी दाखल होत्या. त्यात खंडणीच्या एका तक्रारीत तिला पोलीस चौकशीला सामोरे जावं लागलं होतं. नागपाड्यातील गॉर्डन हॉल अपार्टमेंटमध्ये एका आलिशायन फ्लॅटमध्ये ती राहत होती. या भागात काहींसाठी ती हसीना 'आपा' तर काही जण तिला 'लेडी डॉन' म्हणून ओळखायचे.
मुंबई बॉम्बस्फोटानंतर कुख्याड गुंड दाऊद इब्राहिमनं मुंबई कायमची सोडली. त्यानंतर हसीना पारकर मात्र इथंच राहिली. नागपाडा भागात राहून हसीना हिच दाऊद इब्राहिमच्या बेनामी संपत्तींची देखरेख करते असं पोलीस सूत्रांचं म्हणण होतं. त्यामुळं मुंबई पोलीस तिच्यावर सतत देखरेख ठेवून असतं. हसीनाचा दाऊदशी थेट संपर्क नसला तरी अनेक 'दुव्यां'मार्फत ती संपर्कात राहत असावी, असा तपास यंत्रणांचा कयास होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.