जितेंद्र आव्हाडांचा संशय 'सनातन'वर

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. तसंच यामागे कुणाचा हात आहे, हे देखील स्पष्ट झालेलं नाही. मात्र या हत्येमागे सनातन संस्थेचाच हात असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 20, 2013, 07:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. तसंच यामागे कुणाचा हात आहे, हे देखील स्पष्ट झालेलं नाही. मात्र या हत्येमागे सनातन संस्थेचाच हात असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येमागे एखाद्या हिंदुत्ववादी संघटनांचा हात असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. ‘सनातन’ या संस्थेवर थेट आरोप करत काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
ज्यांना विचारांची लढाई विचारांनी लढणं शक्य होत नव्हतं, अशा संस्थेने डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या केली असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. गेले तीन ते चार महिने ज्या संस्थेच्या पत्रकात दाभोलकरांच्याविरोधी लिखाण केले गेले आहे, अशा संघटनेचाच दाभोलकरांच्या हत्येत हात असू शकतो, असं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे. घडलेली घटना ही धोक्याची घंटा आहे असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी सनातन संस्थेवर बंदीची मागणी केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर डॉ. दाभोलकरांची झालेली हत्या घटना जितकी धक्कादायक आहे, तितकंच त्यासाठी सनातन संस्थेला दोषी ठरवणं धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी व्यक्त केलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.