मुंबई : विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग, झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे युती आणि आघाडी धर्म संकटात आलाय. मुंबईतून कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.
मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बंडखोर यापैकी कुणाला या क्रॉस व्होटिंगचा फटका बसणार, याचा फैसला बुधवारी होणार आहे.
मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या दोन आमदारांच्या नावांवर बुधवारी शिक्कामोर्तब होणार आहे. गेल्या रविवारी मतदान झाल्यानंतर आता निकालाकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय. शिवसेनेचे रामदास कदम, काँग्रेसचे भाई जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार प्रसाद लाड यांच्यात चुरशीची निवडणूक रंगणार आहे. मात्र यावेळी मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
अगदी हमखास विजयाची खात्री असलेली शिवसेनाही यातून सुटली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिवसेनेच्या कोट्यातली पाच मतं प्रसाद लाड यांच्याकडे वळल्याचा दावा केला जातोय, तर दुसऱ्या पसंतीची मतं दिली जाणार नाहीत, असा निर्णय झाला असतानाही शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी त्याकडं दुर्लक्ष केल्याचं समजते आहे. यामागे नेमक्या कुणाच्या सूचना होत्या, हा सध्या शिवसेनेत संशोधनाचा विषय आहे.
भाजपनंही या निवडणुकीत शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केलाय. मात्र खरंच भाजप शिवसेनेच्या पाठिशी राहिली का? हा देखील संशोधनाचा विषय आहे. मतदानाच्या दिवशी भाजप नगरसेवक शिवसेनेपासून अलिप्त राहिल्यानं, भाजपनं आपली मतांची रसद लाडांसाठी तर वापरली नाही ना? अशी चर्चा होतेय. समाजवादी पार्टीनं लाड यांना मतदान करण्याचा व्हिपच आपल्या नगरसेवकांना बजावला होता. मात्र असा काही व्हिप नसल्याचं आता सपाकडून सांगितलं जातंय.
अशा निवडणुकांमध्ये मतफुटीचा काँग्रेसला शापच आहे. त्यामुळे भाई जगतापांना आपली मतं एकसंध ठेवता आलीत का, असा सवाल केला जातोय. उरला प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचा...बंडखोरीनंतर राष्ट्रवादीनं प्रसाद लाड यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसाठी हा सूचक इशारा होता का? राष्ट्रवादीची मतंही लाडांकडे वळली का, अशी चर्चा सुरू झालीय.
मनसेने या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तर अपक्ष नगरसेवकांनी आपापल्या सोयीनुसार मतदान केलं. याचा फायदा नेमका कोणाला झाला, ते बुधवारी निकालाअंती स्पष्ट होईल.