मुंबई : सर्वसामान्य जनतेला परवडेल अशा दरांत घरं उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 'म्हाडा'च आता ग्राहकांना चुना लावत असल्याचं समोर येतंय.
'सकाळ' या वर्तमानपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, विरारमधील 'अल्प उत्पन्न' गटातील ३३० चौरस फूट (कार्पेट एरिया) घरांसाठी ग्राहकांकडून ६५२ चौ. फुटांची (बिल्टअप) किंमत वसूल केली जातेय.
म्हाडानं विरार - ३७५५, बाळकुम ठाणे - १९, मिरा रोड - ३१०, कावसेर ठाणे - १६४ तर वेंगुर्ला - २७ घरांची विक्री जाहीर केलीय. यासाठी १३ जानेवारीपासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे. परंतु, लॉटरीत विजेत्या ठरलेल्या ग्राहकांची घोर फसवणूक होण्याची चिन्हं आहेत.
म्हाडानं दिलेल्या घरांच्या माहितीत कार्पेट एरियाच्या तुलनेत बिल्टअप एरियामध्ये दुप्पट वाढ करून दाखवण्यात आलीय. इमारत बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बिल्टअप एरियानुसार घराची किंमत निश्चित केली जाते.
- विरारच्या मेगा प्रकल्पात अल्प उत्पन्न गटातील घराचं चटई क्षेत्रफळ हे ३०.६८ चौ. मीटर (३३० चौरस फूट) तर बिल्टअप एरिया ६०.६४ चौ. मीटर (६५२ चौ. फूट) दाखवण्यात आलेत.
- ठाण्यातील कावेसरमध्ये घराचं चटई क्षेत्रफळ ३४.८० चौ. मीटर (३७४ चौ. फूट) तर बिल्टअप एरिया ६२.६७ चौ. मीटर (६७४ चौ. फूट) दाखवण्यात आलाय.
नियमाप्रमाणे कार्पेट एरियाच्या तुलनेत २० ते ३० टक्के जास्त बिल्टअप एरिया अपेक्षित असतो; पण या दोन्ही प्रकल्पांत ८० ते १०० टक्के बिल्टअप एरिया विजेत्यांच्या माथी मारला जाणार आहे.
का घडलंय असं...
उल्लेखनीय म्हणजे, विरार बोळिंजमध्ये २४ मजल्यांचा म्हाडाचा टॉवर उभा केला गेलाय. बांधकामाच्या वेळी प्रत्येक मजल्यावर चार फ्लॅट आणि दुहेरी पायऱ्या असा आराखडा होता. पण, एकाच बाजूला पायऱ्या करण्याचा म्हाडाचा प्रयत्न फसला. त्यामुळे आपसुकच इमारतीचा बिल्टअप एरिया वाढला... आणि याच एरियाची वाढीव किंमत आता ग्राहकांकडून वसूल केली जाणार आहे.