मुंबई : वरळी परिसरातल्या गगनचुंबी इमारती मुंबईची नवी ओळख बनत असल्या तरी त्यामागचं गौडबंगाल वारंवार उघडकीला येत असतं. नव्यानं उभ्या राहाणाऱ्या वरळीतल्या अशाच एका इमारतीचं तब्बल १३ मजले अनधिकृत असल्याच्या मुंबई पालिकेच्या आयुक्तांच्या निर्णयाला आता हायकोर्टाचा दुजोरा मिळालाय.
वरळीत श्रीराम अर्बन इन्फ्रास्टक्चर या कंपनीनं २००८ मध्ये ५६ मजली पलाईस रोयाल इमारात बांधण्यास सुरुवात केली. त्यानंतर इमारतीच्या ४४ ते ५६ या मजल्यांच्या बांधकामाविषयी आयुक्तांनी आक्षेप घेतला. आणि हे मजले अनधिकृत असल्याचा निर्देश काढला.
या निर्देशाविरोधात बांधकाम कंपनीनं हायकोर्टात धाव घेतली. कंपनीच्या याचिकेवर सुनावणी करताना आयुक्तांचा निर्णय योग्य असून बांधकाम दोन नियमित करण्यासाठी योग्य ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. तसं न केल्यास चार महिन्यांच्या आत हे सर्व मजले पाडण्याचे आदेशही देण्यात आलेत.