www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेची 22 धोकादायक रेल्वे ठिकाणं ही अपघात मुक्त करण्यासाठी `मुंबई रेल्वे विकास महामंडळ` (एमआरव्हीसी) आता काम करणार आहे. जोगेश्वरी-गोरेगाव, ठाणे-कळवा स्टेशनदरम्यान रूळ ओलांडताना दरवर्षी सुमारे ७७ प्रवासी अपघातात आपला जीव गमावतात. या कारणाने एमआरव्हीसीने या ठिकाणादरम्यान पादचारी पूल तयार करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे २५० कोटी रुपये खर्च होतील, असा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.
उपनगरी मार्गावर अनेक स्टेशनदरम्यान रुळ ओलांडताना दरवर्षी शेकडो प्रवासी जखमी किंवा मृत पावतात. त्यावर आखण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे संख्या कमी होत चालली आहे. परंतु, अद्याप जोगेश्वरी-गोरेगाव आणि ठाणे-कळवादरम्यान अनेक प्रवासी बिनदिक्कत रूळ ओलांडतात. त्यामुळे दरवर्षी ठाणे-कळवादरम्यान जवळपास ४४; तर जोगेश्वरी-गोरेगावदरम्यान ३३ प्रवासी लोकल/एक्स्प्रेसच्या धडकेत मृत पावतात. त्या रोखण्यासाठी महामंडळाने यापूर्वीही दोन्ही रेल्वेच्या सहाय्याने अनेक योजना आखल्या. त्यात, जोगेश्वरी स्टेशनजवळ नवीन पादचारी पूलही बांधण्याचे काम सुरू झाले. परंतु, शॉर्टकटचा पर्याय स्वीकारणाऱ्या प्रवाशांसमोर रेल्वे हतबल ठरली आहे.
जोगेश्वरी-गोरेगाव आणि ठाणे-कळवादरम्यान अनेक रेल्वेप्रवासी रेल्वेरूळ क्रॉस करताना आपला जीव गमावतात. या कारणानेच योग्य योजनेचा वापर करून हे अपघात कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी महामंडळाने नव्याने जे.जे. स्कूल ऑफ आर्किटेक्टची सर्वेक्षणासाठी मदत घेतली आहे. जे.जे. स्कूल ऑफ आर्किटेक्टच्या सर्वेक्षणानुसार २२ जागांची धोकादायक ठिकाणं म्हणून नोंद करण्यात आली आहे. याचा अभ्यास करत महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी नवीन पादचारी पूल बांधण्याची योजना आखली आहे.
यापूर्वी देखील जे.जे. स्कूल ऑफ आर्किटेक्टची सर्वेक्षणाच्या सहाय्याने दादर, विक्रोळी, कांदिवली, जोगेश्वरी सारख्या रेल्वेस्थानकाला प्रवासी पदचारी पूल बांधून अपघात कमी करण्यात रेल्वे विकास महामंडळाला यश आले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.