www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना संधीसाधू म्हटले होते. राष्ट्रवादीने मुंडे यांना जशास तसे उत्तर दिले आहे. मुंडे यांच्यासारखे संधीसाधू व्यक्तिमत्वदेशातही शोधून सापडणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
काँग्रेसचं नेतृत्व हे कमकुवत असल्याचं शरद पवारांनी मान्य केलं आहे, असा आरोप गोपीनाथ मुंडे यांनी पवार यांच्या ब्लॉगवरील लिखाणाचा संदर्भ देऊन म्हटले आहे. मात्र, खरा मित्र तोच असतो जो हरण्याअगोदर मित्राला सल्ला देतो, अशी शेरेबाजी करत गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना संधिसाधू असे संबोधण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे, असे राष्ट्रवादीने म्हटलेय.
प्रत्यक्षात गोपीनाथ मुंडेइतके संधीसाधू व्यक्तिमत्व राज्यातच नव्हे तर देशातही शोधून सापडणार नाही. लोकांना त्यांना लोकसभेत लोकप्रतिनिधी म्हणून पाठविलेले असताना आणि लोकसभेचे अधिवेशन सुरू असतानाही मुंडे केवळ स्वतःचे महत्त्व वाढविण्यासाठी संधीच्या शोधात नागपूर येथील महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात येऊन लक्ष घालू पाहात आहेत. इथल्या राजकारणात लुडबुड करण्याची संधी शोधण्यासाठी त्यांची ही तळमळ अत्यंत केविलवणी म्हणून जनतेसमोर येत आहे, असे मलिक यांनी टीका करताना म्हटलेय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.