कृष्णात पाटील, मुंबई : मुंबईतील एकूण नालेसफाईपैकी 78 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा पालिका प्रशासन करत असले तरी विरोधी पक्ष मात्र या दाव्याशी सहमत नाहीत. जी नालेसफाई केली जाते आहे ती फसवी असून नालेसफाईच्या कामात कंत्राटदार अजूनही काळेबेरे करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.
मुंबईच्या मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. परंतू हायटाईडच्यावेळी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं गाळ काढण्यावर मर्यादा येत आहेत. तसंही मुंबईतील नाले असोत किंवा मिठी नदी, यातील 100 टक्के गाळ काढणं तांत्रिकदृष्ट्या तरी शक्य नाही. तरीही महापालिका प्रशासन 100 टक्के नालेसफाईचा दावा करत असते आणि हे दावे मोठ्या पावसात वाहून जातात. नालेसफाई घोटाळ्यामुळं यापूर्वी होणा-या नालेसफाईचे वास्तव समोर आले आहे. परंतू मागील वर्षीपासून आयुक्तांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेत जेवढी नालेसफाई होईल, ती चांगली कशी होईल याकडं लक्ष दिलं आहे. त्यामुळं शहरात नालेसफाई होत असल्याचं दिसत असलं तरी विरोधक नेहमीप्रमाणे प्रशासनावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत.
विरोधकांसोबतच पहारेकरी असलेल्या भाजपनंही नालेसफाईवरून सत्ताधारी शिवसेनेला टार्गेट केलं आहे. तसंच मुंबईत पाणी साचल्यास त्याला सत्ताधारीच जबाबदार असतील, असा टोलाही हाणला. नालेसफाईवरून होत असलेले राजकारण हे काही नवे नाही, परंतु यावेळी आतापर्यंत सत्तेत असलेला भाजपही विरोधकांच्या साथीनं शिवसेनेला नामोहरम करण्यास सज्ज झाला आहे. त्यामुळं येणारा पावसाळा प्रशासनाबरोबरच शिवसेनेसाठीही कसोटीचा ठरणारा आहे.