मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शिवस्मारकाचं जलपूजन होणार आहे. शिवस्मारकाच्या भूमीपूजनाच्या निमित्ताने 15 वर्षापूर्वी पाहिलेल्या स्वप्नाची पूर्ताता होणार आहे. दरम्यान, आज दिवसभरात मोदींचा कार्यक्रम भरगच्च असणार आहे. मोदी दिल्लीतून ९.२५ वाजता विमानाने मुंबईकडे निघतील ते मुंबईत ११.२५ वाजता पोहोचतील.
पाताळगंगा, जिल्हा रायगड येथील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ सिक्युरीटीज मार्केट्स (सेबीच्या शैक्षणिक उपक्रमच्या नवीन कॅम्पसचे) उद्धाटन दुपारी १२ वाजता होणार आहे. त्यानंतर दुपारी १.५५ वाजता राजभवन येथे आगमन. शिवस्मारकाचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते दुपारी २.५० वाजता, दुपारी ३.५० वाजता बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्स येथे जाहीर कार्यक्रम होणार असल्याने मुंबई पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवलाय. सागरी, यलो गेट पोलीस ठाण्यांच्या पोलिसांसह भारतीय सागरी तटरक्षक दल आणि नौसेना यांनीही अरबी समुद्रात गस्ती वाढविल्या आहेत.
स्थानिक पोलिसांसह शीघ्रकृती दल, एनएसजी कमांडो, फोर्सवन, राज्य राखीव बल, राज्य दहशतवाद विरोधी पथके, नौसेना तैनात ठेवण्यात आलेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी 42 एकरात भराव टाकला जाणार आहे. मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत शिवस्मारकाचा जलपूजन सोहळा घेऊन भाजपाने श्रेय घेण्याची रणनिती आखलीय, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.