मुंबई : नव्वदच्या दशकात धुळे जिल्ह्यातला हा तरूण मुंबई पोलिस दलात दाखल झाला होता, पण सलमानच्या या अपघातात त्याचं आयुष्य असं उध्वस्त होईल, असं कुणालाही वाटलं नव्हतं. अंडरवर्ल्डकडून खंडणीसाठी बॉलीवूडच्या बड्या हिरोंना धमक्या येत होत्या, म्हणून सलमानला रवींद्र पाटीलसारखा उमदा तरूण बॉडीगार्ड म्हणून देण्यात आला होता, मात्र त्याच्या आयुष्यात एवढी मोठी शोकांतिका येईल, हे कुणाला ठाऊक होतं?
'हिट अॅण्ड रन केस'मध्ये सलमानवरील आरोप कोर्टात सिद्ध झाले, त्यावेळेस हा खटला सुरूवातीपासून पाहत आलेल्यांना आठवला तो रवींद्र पाटील. कारण सलमानचा त्यावेळचा बॉडीगार्ड रवींद्र पाटील याने अपघातानंतर साक्ष दिली, ती साक्ष रवींद्र पाटील याने शेवटपर्यंत कायम ठेवली, कदाचित कोर्टात ती सर्वात महत्वाची ठरली असावी. कारण ही साक्ष ग्राह्य धरण्यात येऊ नये, यासाठी सलमानच्या वकिलांनी वेळोवेळी न्यायालयाला विनंती केली होती, मात्र ती विनंती न्यायालयाने फेटाळून लावली होती, मात्र या सत्य बोलण्याचा त्रास झाला तो रवींद्र पाटीलला आणि त्याचं आयुष्य उद्धवस्त झालं.
सलमान खानने दारूच्या नशेत गाडी चालवत होता, त्याचा गाडीवरचा कंट्रोल जात होता, आणि हे आपण त्याला त्याचवेळी बोललो देखिल होतो, असं रवींद्र पाटीलने आपल्या साक्षीत म्हटलं होतं.
ही साक्ष तक्रारीत नोंदवण्यात आली होती, असं म्हटलं जातं की, ही साक्ष बदलण्यासाठी रवींद्र पाटीलवर पोलिस फोर्समधून मोठा दबाव होता, त्यामुळे त्याला मानसिक त्रास ही वाढला होता. रवींद्र पाटीलला याचं नैराश्य आलं, तो 'मिसिंग' झाला, त्याला या दबावापासून दूर जायचं होतं, म्हणून तो एकांत शोधत होता.
तो साक्ष देण्यासाठीही हजर नव्हता, पुढे तो महाबळेश्वरला सापडल्याचं सांगण्यात येतं. साक्षीला आला नाही, म्हणून त्याला अटक झाली, त्याला आर्थररोड जेलमध्ये सराईत गुन्हेगारांजवळ ठेवण्यात आलं, त्याचा त्याला प्रचंड त्रास होत होता. पण विनंती करूनही त्याची जागा बदलण्यात आली नाही.
पोलिस रेकॉर्डवर तो 'मिसिंग'चा 'अॅबस्कॉंडिंग' झाला. त्याची नोकरीही गेली, परिवारापासून तो दूर गेला, नैराश्यात दारूची नशा वाढत गेली, पैसे नसल्याने भिकही मागण्याची वेळ आली, शेवटी अंगातील ताकद संपल्याने टीबीने ग्रासलं, असं म्हटलं जातं, शेवरीच्या टीबी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतांना त्याने आपल्या जवळच्या मित्राला सांगितलं होतं, आजही मी माझ्या साक्षीवर कायम आहे, मला पोलिस कमिश्नरना भेटायचंय, पण रवींद्र या आजारात गेला, उध्वस्त झाला. पण त्याची साक्ष अजूनही जिवंत आणि प्रभावी आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.