मुंबई : मुंबईत पेट्रोल आणि डिझेलची टंचाई भासत असल्याचं म्हटलं जात आहे, ही टंचाई पुढील तीन दिवस कायम राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या पाईपलाईनमध्ये लागलेल्या आगीनंतर ही टंचाई झाली असल्याचं सांगण्यात येत आहे, ही पाईपलाईन लवकरच दुरूस्त होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.
माहूल परिसरात तेलशुद्धिकरण प्रकल्प आहेत. या प्रकल्पांतून पेट्रोल, डिझेल पाईपलाईनद्वारे वडाळा-शिवडीतल्या तेल कंपन्यांच्या टाक्यामध्ये वाहून आणले जाते. पुढे हे इंधन टाक्यांमध्ये साठवले जाते. शिवडी परिसरातील कॅस्ट्रॉल कंपनीच्या ऑईल डेपोमधून ही पाईपलाईन जाते. तिथेच ही आग लागली होती.
शनिवारी सायंकाळी लागली होती आग
वडाळा भागातील कॅस्ट्रॉल कंपनीजवळ शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास अचानक आग लागली. पेट्रोल पाईपलाईनमधील पेट्रोल लिकेजमुळे ही आग लागली होती. वडाळ्यापासून शिवडीपर्यंत पेट्रोल आणि डिझेल साठ्याच्या मोठ्या टाक्या आहेत. या टाक्यांमध्ये दोन टँकमध्ये जवळपास एक कोटी लिटर पेट्रोल साठविले होते.
पेट्रोल पाईपलाईनला लागलेली ही आग पेट्रोल टाक्यांपर्यंत पोहोचली असती, तरी मुंबईतच आगडोंब उसळला असता आणि काही क्षणातच मुंबईचा बहुतांशी भाग बेचिराख झाला असता.
परंतु अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच काळजी घेऊन अथक प्रयत्नांतून ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले. त्यामुळे लाखो लिटर पेट्रोल तर वाचलेच.
शिवाय मोठा अनर्थही टळला आहे. ही आग वेळीच अटोक्यात आली नसती, तर टाक्यांनी आणि रिफायनरीने पेट घेतला असता आणि हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले असते. एवढेच नव्हे, तर अर्धी मुंबई आगीच्या थारोळ्यात सापडली असती. परंतु अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी पुढील अनर्थ टळला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.