मुंबई : दुष्काळ आणि गारपीटीने होरपळलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून थोडीशी का असेना, मदत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण यात एक मोठं वास्तव समोर आलं आहे, अनेक शेतकऱ्यांकडे राष्ट्रीयीकृत बँकेचे अकाऊंट नसल्याने त्यांचे पैसे सरकारच्या तिजोरीत परत गेले आहेत, महाराष्ट्रात एकूण ४६० कोटी रूपये सरकारच्या तिजोरीत परत गेले आहेत.
का आले नाहीत काही शेतकऱ्यांना पैसे?
एका शेताचे वारस अनेक जण असल्यानेही शेतकऱ्यांना ती मदत मिळू शकत नाही, वारसांमधील वादामुळे देखिल ही रक्कम सरकार तिजोरीत नेहमीच पडून असते. जवळ-जवळ एकूण ११ टक्के रक्कम वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचल्याने ती परत आली आहे.
सर्वात जास्त पैसे हे विदर्भातून परत आले आहेत, विदर्भातून २०१ कोटी, त्या पाठोपाठ मराठवाड्यातून १९० कोटी परत आले आहेत, तर नाशिक विभागातून ६२.५ कोटी रूपये परत आले आहेत.
जनधन योजना तरी राबवा
अनेक शेतकऱ्यांचे अजूनही जनधन योजनेत खाते उघडलेले नाहीत, त्यांच्याकडे कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेचे खाते नसल्याने त्यांना पैसे थेट खात्यात पाठवण्यात अडचण येत आहे, म्हणून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी जनधन योजनेवर जोर देण्यावर लक्ष केंद्रीय करावे असं राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
आजही ग्रामीण भागात 'बिना सहकार नही उद्धार'
आजही अनेक शेतकऱ्यांचे खाते हे जिल्हा बँकेत आहेत. कर्जाचा व्यवहार ते सहकारी सोसायट्यांमधून करतात, राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये देखिल शेतकऱ्यांसाठी अनेक कर्ज योजना आहेत, पण आजही शेतकरी राष्ट्रीयीकृत बँकेची पायरी चढण्यासाठी घाबरतात, हे वास्तव आहे.
या उलट केंद्रात आलेलं सरकार प्रत्येक वेळी बजेटमध्ये कृषी क्षेत्रासाठी जास्तच जास्त पैशांची तरतूद करतांना दिसतं, मात्र प्रत्यक्षात शेतीसाठी हे पैसे बँका देण्यास उत्सूक नसल्याचं चित्र आहे.
बँक खात्याचा तपशील तलाठ्याला द्या
ज्या शेतकऱ्यांकडे राष्ट्रीयीकृत बँकेचं खातं आहे, त्यांनी त्याचा तपशील संबंधित तलाठ्याला देणे आवश्यक आहे, तलाठी या अकाऊंटची नोंद घेणार आहे, यानंतर हे अकाऊंट त्या शेतकऱ्याच्या नावे जोडलं जाणार आहे, यापुढे याच अकाऊंटवर शेतकऱ्याला थेट मदत मिळणार आहे, शेतकऱ्यांना मिळणारी मदत दुसऱ्याने हडपल्याचे प्रकार वाढत असल्याने हा उपाय काढण्यात आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.