मुंबई : शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला डिवचले आहे. भाजपमध्ये प्रतिभावंत व्यक्तींची कमतरता असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. 'सामना'च्या अग्रलेखात भाजपबद्दल हे मत व्यक्त करण्यात आले आहे.
भारतीय जनता पक्षात प्रतिभावंत व्यक्तींची कमतरता असल्याचे वक्तव्य विनय सहस्रबुद्धे यांनी केले आहे. या विधानाला शिवसेनेनेही दुजोरा दिला आहे. 'सहस्रबुद्धे हे संघ परिवाराचे जुने-जाणते शिलेदार आहेत. बोलण्या-वागण्याचे आकांडतांडव ते करीत नाहीत. तरीही ते सत्य बोलून गेले. हा संघ परिवाराचा आतला आवाज तर नाही ना?‘ असा प्रश्नही अग्रलेखात उपस्थित केलाय.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिभा आकाशाला गवसणी घालणारी आहे. मोठा देश चालविण्यासाठी त्यांना त्यांच्याप्रमाणेच शंभर समर्थ हातांची गरज असल्याचे मत शिवसेनेने व्यक्त केलेय. तसेच यापूर्वीच्या सरकारांचा आणि त्यांच्याकडील प्रतिभावंत व्यक्तींचा आढावाही घेण्यात आला आहे. त्यामध्ये मनमोहन सिंग यांच्यापेक्षा प्रणव मुखर्जी हे अधिक चांगले पंतप्रधान ठरले असते असे म्हणतच कॉंग्रेसमध्ये सोनियानिष्ठेचा विचार केला जात असल्याची टीकाही केली आहे.
दरम्यान, मनमोहन सिंग यांचे कौतुक करताना 'टॅलेण्ड' या शब्दाशी ज्यांचा काडीचाही संबंध नव्हता ते देवेगौडा यांच्यासारखे लोकही कधीकाळी देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले असल्याची टीका या अग्रलेखात करण्यात आलेय.