मुंबई : शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांवर टांगती तलवार आहे. शिवसेनेच्या विधान परिषदेतल्या ज्येष्ठ आमदारांची मंत्रीपदं जाण्याची शक्यता आहे.
मंत्र्यांच्या कामगिरीवर पक्षनेतृत्व असमाधानी आहे आणि पक्षबांधणी अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीनं पक्षनेतृत्व हा निर्णय घेणार असल्याचं समजतंय. शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या कामगिरीवर पक्षाच्याच आमदारांचा रोष आहे.
शिवसेनेत 5 पैकी 4 कॅबिनेट मंत्रीपदं विधान परिषदेकडे आहेत. पण मंत्री काहीही कामाचे नाहीत, अशी विधानसभेतल्या आमदारांची भावना आहे.... आमदारांनी वेळोवेळी ही भावना उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली होती. अखेर त्याची गंभीर दखल घेत आता त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, फेरबदलात राज्यमंत्री संजय राठोड यांना कॅबिनेट मंत्रीपदावर बढती मिळू शकते. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राठोड यांनी त्यांच्या मतदार संघात चांगले निकाल दिले होते. तसेच पक्षाच्या काही राज्यमंत्र्यानाही बढती मिळण्याची शक्यता आहे.