दीपक भातुसे, मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेनेनं सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्यात. त्याच वेळी भाजपा मात्र शांत आहे. ही शांतता का आहे, असं कोडं पक्षाच्या कार्यकर्त्यांना पडलं असतानाच झालं गेलं विसरून जाऊन शिवसेनेशी तडजोड करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याची माहिती समोर आलीय.
मुंबई महापालिकेत जनतेनं कुणालाच बहुमत दिलं नाही... 84 जागांसह शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला, तर त्याखालोखाल 82 जागा जिंकून भाजपानंही जोरदार मुसंडी मारली... 5 अपक्ष नगरसेवकांसह शिवसेनेचं संख्याबळ 89 झालं असताना भाजपानं मात्र आपले पत्ते उघड केलेले नाहीत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता 'रात गयी बात गयी' असं म्हणत शिवसेनेशी पॅचअप करण्याचे प्रयत्न भाजपानं सुरू केलेत. भाजपाच्या काही नेत्यांनी शिवसेनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील नेत्यांशी गुप्त चर्चा सुरू केल्याची माहिती मिळाली असून त्यांच्यामार्फत उद्धव ठाकरेंपर्यंत निरोप पोहोचवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.
भाजपा बॅकफूटवर येण्याचं कारण प्रश्न केवळ मुंबई महापालिकेचा नाही... कोल्हापूर, सांगली, नाशिक, जालना, औरंगाबाद, हिंगोली, बुलढाणा आणि यवतमाळ या आठ जिल्हा परिषदांमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपाला शिवसेनेची गरज पडणार आहे.
शिवाय फडणवीस सरकारलाही स्थैर्यासाठी शिवसेना बाहेर जाण्यापेक्षा आतच असणं सोयीचं आहे. म्हणूनच शिवसेनेनं आकड्यांची जुळवाजुळव सुरू केली असताना भाजपाच्या तंबूत मात्र शांतता आहे. होता होई तो शिवसेनेशी जुळवून घ्यावं, अशी मानसिकता बळावल्याचं चित्र आहे. मात्र, पुन्हा युती करण्यासाठी पुढाकार कोण घेणार? असा इगो या नव्या समीकरणांच्या आड येतोय.
10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांचे निकाल लागल्यानंतरच जिथे गरज असेल तिथे भाजपा-शिवसेनेने पुन्हा युती करावी अशी वक्तव्य भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्यातील ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवरही भाजपाने आता शिवसेनेबरोबर एवढा संघर्ष होऊनही पॅचअप करण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.