www.24taas.com, झी मीडिया, चंद्रपूर
राज्य महिला आयोगाचं गठन न करणारं महाराष्ट्र सरकार महिलांच्या प्रश्नाविषयी असंवेदनशील असल्याचा हल्लाबोल करताना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी टार्गेट केलं.
चंद्रपूर जिल्ह्यातील एका महिला वनविभाग कर्मचा-याने आपल्याच वरिष्ठ RFO विरोधात लैंगिक छळाची तक्रार केली आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेतील एका महिला ग्रामसेविकेने उप-मुख्य कार्यकारी अधिका-याच्या विरोधात बदलीसाठी शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार केली. या दोन्ही प्रकरणी कारवाई झालीच नाही.
असं असताना अशीच एक घटना चंद्रपूरच्या कन्यका नागरी सहकारी बँकेत घडली. बँकेच्या महिला कर्मचा-याने अश्लील एसएमएस येत असल्याची तक्रार करुन बँकेला मदतीची मागणी केली. मात्र बँकेने तिलाच बडतर्फ केले. जिल्ह्यातील महिला अत्याचारासंबंधात आढावा घेण्यासाठी आलेल्या निर्मल सामंत यांनी राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली.
राज्य महिला आयोग गठीत करा यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना साकडं घालूनही यश आलं नाही,असा गौप्यस्फोट प्रभावळकर यांनी केला. प्रभावळकर यांनी आपल्याच पक्षाला टार्गेट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.