मुकुल कुलकर्णी, www.24taas.com, नाशिक
नाशिकमध्ये पाण्यावरून राजकारण सुरु झालंय. शिवसेनेच्या नगरसेवकांनी स्वतःच्या प्रभागात पाणीकपात सुरु केली आहे. मात्र सत्ताधारी मनसेचा या पाणीकपातीला विरोध आहे. नाशिकमध्ये पाण्याचं राजकारण सुरू आहे. पण या सगळ्यात नाशिककरांचं मत कुणीच विचारात घेत नाही.
नाशिकमध्ये दिवाळीच्या वेळी पाणी कपात रद्द करा अशी मागणी करणारे विरोधक आता पाणीकपात सुरु करा अशी मागणी करत आहेत. शिवसेनेचे नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी तर त्यांच्या प्रभागात एक दिवसाची पाणी कपात सुरूही केली आहे. त्या पाठोपाठ शिवसेनच्या ताब्यात असणाऱ्या सिडको प्रभाग समितीतही सभापतींनी आठ दिवसातून एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेच्या नगरसेवकांनी मात्र या पाणीकपातीला विरोध केलाय. शिवसेना पाण्याचं राजकारण करत स्टंटबाजी करत असल्याचा मनसेचा आरोप आहे.
भविष्यात जाणवणारी पाणी टंचाई लक्षात घेऊन शिवसेनेनं हे पाणीकपातीचं पाऊल उचलल्याचा दावा शिवसेना करतेय, मात्र नागरिकांचा विचार कोणीच करत नाही. मुळात सिडको प्रभागात आधीच कमी दाबानं आणि एक वेळच पाणीपुरवठा केला जातोय. आधी पुरेसं पाणी द्या नंतर पाणी कपात करा असा सल्ला नागरिक देत आहेत.
पाणीकपातीचा निर्णय सारासार विचार करून महासभेत घेणं अपेक्षित आहे. त्यामुळे नगरसेवकांनी परस्पर निर्णय घेऊ नये अशी अपेक्षा नाशिककरांची आहे. जलकुंभ आणि जलवाहिनीतून होणारी पाणी गळती थांबविण्यासाठी महापलिकेन आधी कारवाई केली असती तर पाणीकपातीची वेळच आली नसती. त्याकडे तर महापालिकेनं लक्ष दिलंच नाही. आणि आता पाण्याच्या प्रश्नावर राजकारण मात्र जोरात होतंय.