www.24taas.com, अहमदनगर
केवळ प्रशासकीय बदल्या टाळण्यासाठी बोगस अपंगाचे प्रमाणपत्र सदर केल्याची खळबळजनक घटना अहमदनगर मध्ये उघडकीस आली आहे. तब्बल २१२ शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र सदर केले होते. परंतु प्रमाणपत्र सदर केलेले शिक्षक अपंग नसल्याचे कळताच ७६ शिक्षकांवर अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.
जून २०१३ आणि जुलै २०१३ या महिन्यांमध्ये जिल्हा अंतर्गत शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. मात्र आपली बदली होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या २१२ प्राथमिक शिक्षकांनी अपंगाचे बोगस प्रमाणपत्र जिल्हा परिषदेत सदर केले. मात्र प्रत्यक्षात ज्या शिक्षकांनी हे प्रमाणपत्र सदर केले ते शिक्षकच मुळात अपंग नसल्याची माहिती समोर येताच जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांनी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली. नवनाथ औताडे यांच्या तक्रारीवरून बोगस अपंगाचे प्रमाणपत्र सदर केलेल्या एकूण ७६ शिक्षकांवीरोधात कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अपंग असलेल्या शिक्षकाला आपल्या आवडीने बदली करून घेता येते आणि त्यामुळेच हा प्रकार घडला. ७६ शिक्षकांवर गुन्हे दाखल केल्याची घटना प्रथमच घडली यातील २५ जणांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सदर केले होते परंतु हे अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावत या शिक्षकाना जोरदार दणका दिला आहे. आता या भामट्या शिक्षकांना कधी अटक होणार या कडे जनतेचे लक्ष लागून आहे . येणाऱ्या युवा पिढीला घडवण्याचे काम गुरुजनांनी करायचे असते आणि तेच गुरु असे वागत असेल तर आता मास्तर तुम्ही सुधा म्हणायची वेळ आली आहे .