मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि ब्रायन लाराही जे करू शकले नाहीत, असं क्रिकेटर अजिंक्य रहाणेनं आज लॉर्डसच्या मैदानावर करून दाखवलंय.
अजिंक्य लॉर्डसच्या मैदानावर शतक ठोकणारा नववा भारतीय क्रिकेटर ठरलाय. जेव्हा कधी इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळलं जातं तेव्हा लॉर्डस् टेस्टची चर्चा सर्वात अधिक होताना दिसते. ‘क्रिकेटचा मक्का’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्डसवर शतक ठोकण्याची इच्छा तर प्रत्येक क्रिकेटरची असते.
अजिंक्य रहाणेच्या आधी लॉर्डसच्या मैदानावर वीनू मांकड, दिलीप वेंगसरकर, गुंडप्पा विश्वनाथ, रवी शास्त्री, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, अजित आगरकर आणि राहुल द्रविड या भारतीय क्रिकेटर्सनं शतक ठोकण्याची कामगिरी करून दाखवलीय.
उल्लेखनीय म्हणजे, आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर असंही दिसेल की जेव्हा केव्हा लॉर्डसवर कोणत्या भारतीय खेळाडूनं शतक ठोकलंय तेव्हा तेव्हा टीम इंडियाला पराभव पत्करावा लागलाय (एक मॅच सोडून) किंवा टेस्ट ड्रॉवर संपलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.