बंगळूरु : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचा टी-२० कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अतिशय चतुराईने विजयश्री खेचून आणली. दबावाच्या परिस्थितीत स्वत:ला तसेच सहकाऱ्यांचे मनोबल कसे वाढवावे हे खरंच धोनीकडून शिकावे.
शेवटच्या षटकांतील चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर पंड्याला विकेट मिळाल्यानंतर शेवटच्या चेंडूसाठी धोनीने खास रणनीती आखली. यासाठी त्याने वेळही घेतला त्याला माहीत होते अखेरच्या षटकासाठी वेळ घेतल्यास काही फरक पडणार नाही.
अखेरच्या चेंडूत बांगलादेशचे फलंदाज कोणत्याही परिस्थितीत धाव काढणार हे धोनीला कळून चुकले होते. त्यामुळे त्याने पंड्याशी काही वेळ चर्चा केली. तसेच यॉर्कर टाकू नये असा सल्ला त्याला दिला. यादरम्यान त्याने आपल्या हातातला एक ग्लोव्ह काढून ठेवला. कारण जर फलंदाज चेंडू खेळू शकला नाही तर हातातून ग्लोव्ह काढायला जितका वेळ लागेल तितक्या वेळेत फलंदाज धाव काढू शकतो. तसेच ग्लोव्ह असतात स्टंपिंग करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी खबरदारी म्हणून धोनीने ही रणनीती आखली आणि ती यशस्वीही झाली.
धोनीने सांगितल्याप्रमाणे पंड्याने यॉर्कर न टाकता ऑफ स्टम्पबाहेर शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू टाकला. त्यानंतर धोनीने स्टंपजवळ धावत येत बांगलादेशच्या फलंदाजाला बाद केले.