www.24taas.com, न्यूयॉर्क
गुगलपाठोपाठ आता फेसबुकही फ्रीमध्ये मॅसेज पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या विचारात आहे आणि त्यामुळेच फेसबुकनं व्हॉटस् अपला विकत घेण्याची तयारी दाखवलीय.
फेसबुक मोबाईल, चॅटींग आणि मॅसेजिंग हे तरुणाईचे परवलीचे शब्द... फेसबुकनं फारच थोड्या कालावधीत तरुणाईला जिंकलंय. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत मॅसेजिंगची उणीव भरून काढायचं फेसबुकनं ठरवलंय. या पार्श्वाभूमीवर नव्याने सॉफ्टवेअर विकसित करण्यापेक्षा लोकप्रिय अशा ‘वॉटस् अप’च्या खरेदीचा विचार कंपनीने केला असून, या अनुषंगाने ‘वॉट्स अप’च्या निर्मात्यांशी चर्चा सुरू केल्याचे वृत्त आहे. या व्यवहाराची चर्चा सध्या सुरू असून, किमतीच्या अनुषंगाने वाटाघाटी होत आहेत. नववर्षात यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे, नुकतीच मोबाइल फोटो आणि अपलोड संदर्भातील ‘इन्स्टाग्राम’ आणि ‘फेस डॉट कॉम’ची खरेदी फेसबुकनं केलीय. त्यानंतर आता फेसबुक ‘व्हॉटस् अप’लाही आपल्यासोबत सामील करणार का याकडे नेटीझन्सचं लक्ष लागलंय.
नुकतंच, ‘गुगल’नं ‘जीमेल’ आणि ‘गुगल अॅप्स’वरून मोफत एसएमएस सेवा नुकतीच सुरू केलीय. भारतासह ५१ देशांमध्ये गुगलने ही सेवा सुरू केलीय. आता फेसबुक मॅसेजिंगच्या बाबतीतही गुगलला पछाडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.