www.24taas.com, झी मीडिया, सिंधुदुर्ग
सिंधुदुर्गामध्ये पर्सीनेटधारक आणि छोटे मच्छीमार यांच्यातला वाद आणखी चिघळलाय. याच वादातून पर्सीनेटधारकांची गाडी फोडण्यात आलीय. या प्रकरणी आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. हा वाद राजकीय वळण घेत असल्यानं आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्गात सध्या मासेमारीवरुन मारामारी सुरू झालीय. पर्सीनेटधारक आणि छोटे मच्छीमार यांच्यात गेली ३ वर्षं वाद सुरु आहे. पर्सीनेटधारक किनारपट्टीवर येऊन बारीक आसाच्या जाळ्यांनी मासेमारी करतात. त्यामुळे छोट्या मच्छीमारांना मासे मिळेनासे झालेत. यातूनच छोटे मच्छीमार आणि मोठे मच्छीमार असे दोन गट निर्माण झालेत. गेले काही महिने हा वाद चिघळत चाललाय.
याच वादातून आठ दिवसांपूर्वी ५ टन मासे अधिका-यांच्या टेबलावर ओतण्यात आले होते. आता हा संघर्ष आणखी चिघळलाय. छोट्या मच्छीमारांनी पर्सीनेट धारकाची गाडी फोडलीय. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतलंय. कोकणातल्या मच्छीमारांच्या या वादाला राजकीय किनारही आहे. त्यामुळे येत्या काळात हा वाद आणखी चिघळण्याचीच शक्यता दिसतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.