पुणे : एमपीएससी (mpsc) राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलल्याने राज्यातील विद्यार्थ्यांचा उद्रेक पहायला मिळत आहे. पुण्यात शास्त्री रस्ता येथे विद्यार्थ्यांनी आक्रमक आंदोलन केले आहे. ही परीक्षा आतापर्यंत चार वेळा पुढे ढकलली गेली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचा संताप होत आहे.
राज्यात कोरोनाकाळातही नीट, बँकींग आणि स्पर्धा परीक्षा व्यवस्थित पार पडल्या आहेत. परंतु एमपीएससीच्या परीक्षा वेळोवेळी पुढे ढकलण्यात आल्या. राज्यातील लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसत असतात.
परीक्षेची जाहिरात जाहीर - 23 डिसेंबर 2019
परीक्षेची तारीख - 5 एप्रिल 2020
सुधारीत तारीख - 13 सप्टेंबर 2020
सुधारीत तारीख - 20 सप्टेंबर 2020
सुधारीत तारीख - 11 ऑक्टोबर 2020
सुधारीत तारीख - 14 मार्च
आता पुन्हा पुढची तारीख कळवण्यात येईल असे परिपत्रक जारी झाले आहे.
आयोगाने आतापर्यंत 5 वेळा कोरोना, नीट परीक्षा, मराठा आरक्षण आदी कारणांमुळे परीक्षा पुढे ढकलली आहे. काही वेळा एमपीएससीने स्वतःहून परीक्षा पुढे ढकलली तर, काही वेळा सरकारने ही परीक्षा पुढे ढकलण्यासाठी पत्र दिले आहे.
तासन् तास विद्यार्थी अभ्यास करीत असतात. आधीच कोरोना काळात विद्यार्थ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. त्यात एमपीएससी आणि सरकारच्या बेजबाबदार निर्णयांमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.