मुंबई: 'भाळी अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा, लिंपीले सर्वांगा चिताभस्म...' हे गित आपण अनेक वेळा ऐकले असेल. कदाचित हे गाणे ऐकताना आणि भगवान शंकराची मूर्ती पाहूनही आपल्या मनात अनेकदा विचार आला असेल. शंकराच्या डोक्यावर चंद्रकोर का असते? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पुराणकथांचा आधार घेतला की सापडते.
पुराण कथेत सांगितल्याप्रमाणे चंद्रमेचा विवाह दक्ष प्रजापतीच्या २७ कन्येंसोबत झाला होता. या कन्या २७ नक्षत्रं आहेत. यात चंद्रमा आणि रोहिणी यांच्यात विशेष स्नेह होता. या स्नेहाची तक्रार जेव्हा अन्य कन्यांनी दक्षाकडे केली तेव्हा दक्षाने चंद्रमेला क्षय होण्याचा शाप दिला. या शापातून स्वत:चा बचाव करण्यासाठी चंद्रमेने भगवान शंकराची प्रर्थना केली. चंद्रमेची तपश्चर्या पाहून भगवान शिव प्रसन्न झाले. इतके की त्यानी चंद्रमेचे प्राण तर वाचवलेच. पण, तिला आपल्या शिर्षस्थानीही स्थान दिले. चंद्रमेने ज्या ठिकाणाहून शंकराची तपश्चर्या केली त्या ठिकाणाला सोमनाथ म्हणून ओळखले जाते. दक्षाच्या शापामुळेच चंद्रमा ही कले कलेने घटते आणि वाढते, असेही एक अनुमान लावले जाते.
दरम्यान, दरम्यान, भगवान शंकराला महादेव म्हणूनही ओळखले जाते. जगभरातील तमाम शिवभक्तांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज महाशिवरात्री जगभरात उत्साहाने साजरी केली जात आहे. अर्थात, अनेक वर्षांनंतर दुर्मिळ योग आल्याने काही ठिकाणी १३ तर काही ठिकाणी १४ फेब्रुवारीलाही महाशिवरात्री साजरी केली जात आहे.