Asia Cup 2022 : आशिया स्पर्धेत भारताने आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. दुबळ्या हॉंगकॉंगचा टीम इंडियाने 40 धावांनी धुव्वा उडवला आहे. सुर्यकुमार यादव आणि विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने हॉंगकॉंगसमोर 193 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारतीय वेगवान माऱ्यासमोर हॉंगकॉंगचा संघ 20 षटकात 152 धावाच करू शकला. भारताने सलग दुसरा विजय मिळवत सुपर 4 संघांमध्ये स्थान मिळवलं आहे.
सुर्यकुमार यादवने 26 बॉलमध्ये हे 68 धावांची तुफानी खेळी केली आहे. या खेळीत त्याने 6 सिक्स आणि 6 फोर मारले आहेत. त्याआधी रोहित शर्मा 21 आणि के एल राहूलने 36 धावा केल्या आहेत. या बळावर टीम इंडियाने 2 विकेट गमावून 192 धावा ठोकल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना हाँगकाँग संघाची दमछाक झाली.
हॉंगकॉंगकडून बाबर हयातने सर्वाधिक 41 धावांची खेळी केली. निझाकत खान 10, यासीन मुर्तझा 9 दोन्ही सलामीवीर स्वस्तात परतले. झीशा अलीने नाबाद 26 धावांची खेळी केली. मात्र हॉंगकॉंगचा संघ भारताविरोधात निर्धारित 20 षटकात 152 धावा करू शकला. भारताकडून अर्शदीप, आवेश, रविंद्र आणि भुवनेश्वर यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला.
विराटने या सामन्यात 59 धावांची सावध खेळी करत आपली विकेट जाऊन दिली नाही. फास्ट फॉरमॅट असलेल्या टी20मध्ये 40 बॉल्समध्ये अर्धशतक झळकावलं आहे. या खेळीत त्याने 1 फोर आणि दोन सिक्स ठोकले आहेत. विराट कोहलीची ही खेळी खुपच संथ असल्याने त्याच्यावर टीका देखील झाली. मात्र तो पुन्हा लयीत आल्याने आशिया कपच्या दृष्टीने टीम इंडियासाठी मोठी दिलासादायक बातमी आहे.