Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव... भारतीय क्रीडा क्षेत्रात या नावावर सध्या एक प्रश्नचिन्हा उपस्थित झालंय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये (ODI Cricket) फ्लॉप ठरणारा हा फलंदाज टी20 (T20 Cricket) तर खोऱ्याने धावा काढतो कसा? टी20 क्रिकेटमध्ये सूर्याच्या फलंदाजीला बहार येतो. चौकार-षटकारांची बरसात होते. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांच्या फलंदाजीला ब्रेक लागतो. ब्रेक पण असा की टी20 क्रिकेटमध्ये फटकेबाजी करणारा सूर्या (Suryakumar Yadav) हाच आहे का असा प्रश्न उपस्थित व्हावा. एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात संधी मिळूनही फ्लॉप ठरलेला सूर्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 सामन्यात मात्र चमकला. चौकार षटकारांची बरसात करत त्याने अवघ्या 42 चेंडूत 80 धावा केल्या.
टी20 तल्या कामगिरीचं रहस्य
सूर्यकुमार यादवच्या टी20 मधल्या कामगिरीचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे त्याचा फलंदीचाला येण्याचा क्रमांक. टी20 सामन्यात सूर्यकुमार यादव तिसऱ्या किंवा चौथख्या क्रमांकाला फलंदाजीला येतो. स्थानिक क्रिकेटमध्येही सूर्या याच क्रमांकावर खेळायचा. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये सूर्या सहाव्या स्थानावर खेळायला येतो. त्यामुळे त्याला खेळपट्टीवर स्थिरावायला तितकासा वेळ मिळत नाही. उदाहरणार्थ रोहित शर्मा, शुभमन गिल किंवा विराट कोहली पहिल्या तीन स्थानावर येतात. त्यामुळे त्यांच्याकडे खेळपट्टीवर स्थिरावण्याचा आणि धावा करण्याचा पुरेसा वेळ असतो. त्यामुळे सूर्याला टॉप मिडल ऑर्डरमध्ये संधी देण्याची गरज आहे.
टीमच्या रणनितीचं प्रेशर
एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटची रणनीती खूप वेगळी आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सूर्याची भूमिका फिनिशर म्हणून आहे. एका मुलाखतीत सूर्याने याबाबत माहिती दिली. फलंदाजीला आल्यावर 30 ते 40 चेंडूत आक्रमक धावा करण्यासाठी त्याच्यावर टीम व्यवस्थापनाचं प्रेशर असतं असं त्याने या मुलाखतीत सांगितलं होतं.
टी20त आक्रमक फलंदाजी
टी20 क्रिकेटमध्ये गोलंदाजांची मानसिकता वेगळी असते. गोलंदाजांना पहिल्या चेंडूपासूनच धावा रोखण्यावर भर द्यावा लागतो. त्यामुळे त्यांची लाईन-लेंग्थ वेगळी असते. सूर्यकुमार यादवला गोलंदाजांची ही रणनिती चांगलीच अवगत झाली आहे. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये परिस्थिती वेगळी असते. गोलंदाजांचा धावा रोखण्यापेक्षा विकेट घेण्याकडे कल असतो. पण सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला यावं लागत असल्यामुळे सूर्याला टी20 क्रिकेटसाऱखीच फलंदाजी करावी लागते. परिणामी विकेट जाण्याची जास्त शक्यता असते.
आत्मविश्वासाचा अभाव
टी20 क्रिकेटमध्ये सूर्यसुमार यादवचा आत्मविश्वास आता बऱ्यापैकी वाढला आहे. मैदानावर उतरल्यावर धावा कशा करायच्या याचं त्याला गिमिक सापडलंय. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये अद्यापही तो स्थिरावलेला नाही. फलंदाजीची संधी मिळेलच असं नाही, त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याचा आत्मविश्वास कमी आहे.