Ex Captain Death Rumour: झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू हीथ स्ट्रीकच्या निधनाची बातमी देणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यानेच आता तो जिवंत असल्याचा दावा केला आहे. एकेकाळी हीथबरोबर झिम्बाब्वेच्या संघाकडून खेळणाऱ्या हेन्री ओलोंगाने झिम्बाब्वेच्या या सर्वकालीन सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूचं कॅन्सरशी झुंज सुरु असताना मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं. मात्र ही पोस्ट केल्यानंतर जो हीथ मरण पावल्याचं सांगण्यात आलं त्यानेच हेन्रीला मेसेज केला. हेन्रीने या मेसेजचा स्क्रीनशॉट पोस्ट करत तो जिवंत असल्याचं सांगितलं आहे.
काही काळापूर्वी हीथने दक्षिण आफ्रिकेमध्ये केलेल्या चाचण्यांदरम्यान त्याला कॅन्सर असल्याचं निदान झालं. तेव्हापासूनचतो कर्करोगाशी लढा देत आहे. हीथवर यकृताच्या कॅन्सरचा उपचार सुरु असतानाच आज सकाळी हेन्री ओलोंगाने 49 व्या वर्षी हीथचा मृत्यू झाल्याचं म्हटलं. याच ट्वीटच्या आधारे झिम्बाब्वेमधील स्थानिक प्रसारमाध्यमांबरोबरच जगभरातील अनेक प्रसारमाध्यमांनी हीथच्या निधनाच्या बातम्या केल्या. या बातम्यांमध्ये हेन्री ओलोंगाच्या ट्वीटचाच संदर्भ देण्यात आला होता. मात्र हे ट्वीट केल्यानंतर काही तासांनी हेन्री ओलोंगाने ट्वीट डिलीट केलं. त्यानंतर त्याने हीथसंदर्भात नवीन ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये त्याने हीथकडूनच आलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट पोस्ट केला.
"मी हे सुनिश्चित करु इच्छितो की हीथ स्ट्रीकच्या निधनाची अफवा पसरली आहे. आता मला त्याचाच मेसेज आला. तिसऱ्या पंचांनी त्याला पुन्हा बोलवून घेतलं. तो जिवंत आहे," अशा कॅप्शनसहीत हीथने पाठवलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट हेन्री ओलोंगाने पोस्ट केला आहे. "अरे मी जिवंत आहे. तातडीने हा धावबाद देण्याचा निर्णय मागे घे," असा मेसेज हीथ स्ट्रीकने स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजून 22 मिनिटांनी केला. यावर हेन्री ओलोंगाने त्याला रिप्लाय केला. "हाहा.. हे ऐकून बरं वाटलं. अशा गोष्टी वेगाने पसरतात," असा रिप्लाय हेन्री ओलोंगाने केला.
I can confirm that rumours of the demise of Heath Streak have been greatly exaggerated. I just heard from him. The third umpire has called him back. He is very much alive folks. pic.twitter.com/LQs6bcjWSB
— Henry Olonga (@henryolonga) August 23, 2023
ओलोंगाने हीथचं निधन झाल्याची बातमी पोस्ट करताना क्रिकेटमधील संदर्भ वापरला होता. "हीथ स्ट्रीक दुसऱ्या बाजूला गेल्याची दु:खद बातमी समोर येत आहे. झिम्बाब्वे क्रिकेटमधील या महान खेळाडूलच्या आत्म्याला शांती लाखो. तो झिम्बाब्वे क्रिकेटने घडवलेल्या सर्वकालीन सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू होता. तुझ्यासोबत खेळणे फारच समाधानकारक आणि आनंद देमारं होतं. माझ्या गोलंदाजीचा स्पेल संपल्यावर (आयुष्य संपल्यावर) आपण दुसर्या बाजूला भेटू," असं ओलोंगाने ट्वीटरवरुन म्हटलं होतं. याच ट्वीटनंतर हीथनेही क्रिकेटचासंदर्भ देतच आपण जिवंत असल्याचं सांगितलं.
भारताचा फिरकीपटू आर. अश्विन आणि सलामीवीर विरेंद्र सहेवागनेही हीथला श्रद्धांजली अर्पण केली होती. मात्र या दोघांनीही आपल्या पोस्ट डिलीट केल्या आहेत.