11 दिवसांपूर्वी निधनाची अफवा अन् आज खरंच त्या क्रिकेटपटूचं झालं निधन! पत्नीची पोस्ट पाहून डोळे पाणवतील

Legendary Cricketer Battling Cancer Died: 11 दिवसांपूर्वीच त्याचं निधन झाल्याची बातमी समोर आल्यानंतर त्याने स्वत: ही अफवा असल्याचं सांगितलं होतं. मात्र आज पहाटे या क्रिकेटपटूने जगाचा निरोप घेतला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 3, 2023, 01:39 PM IST
11 दिवसांपूर्वी निधनाची अफवा अन् आज खरंच त्या क्रिकेटपटूचं झालं निधन! पत्नीची पोस्ट पाहून डोळे पाणवतील title=
पत्नीनं केलेली पोस्ट चर्चेत

Heath Streak Death: झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू हीथ स्ट्रीकचं आज (3 सप्टेंबर 2023) पहाटे निधन झालं. हीथ स्ट्रीक 49 वर्षांचा होता. मागील बऱ्याच काळापासून तो कॅन्सरशी झुंज देत होता. यापूर्वीही हीथ स्ट्रीकच्या निधनाची बातमी आली होती. मात्र आपण जिवंत असल्याचं हीथ स्ट्रीकनेच जाहीर करत निधनाचं वृत्त अफवा असल्याचं सांगितलं होतं. मात्र ही अफवा असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आज 11 दिवसांनी हीथने खरोखरच जगाचा निरोप घेतला आहे. त्याची पत्नी आणि वडिलांनी हीथचं निधन झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

वडिलांनी दिला वृत्ताला दुजोरा

हीथचे वडील डेनिस यांनी त्याच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'संडे न्यूज'ने डेनिस स्ट्रीकच्या हवाल्याने, 'हीथ मागील काही काळापासून प्रकृतीसंदर्भात समस्यांना तोंड देत होता. मागील 6 महिन्यांपासून त्याची कॅन्सरशी झुंज सुरु होती. रविवारी मध्यरात्रीनंतर 1 वाजता त्याने जगाचा निरोप घेतला,' असं वृत्त दिलं आहे. 

पत्नीची भावनिक पोस्ट

हीथ स्ट्रीकची पत्नी नादीनने पतीच्या निधनासंदर्भात फेसबुकवर भावूक पोस्ट लिहिली आहे. "आज पहाटेच्या सुमारास माझ्या आयुष्याचं प्रेम, माझ्या मुलांचा पिता असलेल्या हीथला स्वर्गातील दूत त्यांच्यासोबत घेऊन गेले. त्याला त्याचे शेवटचे क्षण घरातच घालवायचे होते. शेवटच्या क्षणी तो त्याच्या कुटुंबियांबरोबर आणि नातेवाईकांबरोबर होता. पण तो एकटाच गेलेला नाही. आमचे आत्मे कायमचे एकमेकांशी जोडलेले आहेत. आपण पुन्हा भेटूच..." असं नादीनने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

बातमी झालेली व्हायरल

23 ऑगस्ट रोजी हीथच्या निधनाचं वृत्त व्हायरल झालं होतं. झिम्बाब्वेचा माजी वेगवान गोलंदाज आणि स्ट्रीकबरोबर अनेक वर्ष क्रिकेट खेळलेल्या हेन्री ओलोंगाने त्याच्या एक्स हँडलवरुन एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिलेली. मात्र नंतर ओलोंगाने आपल्या व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर करत हीथच्या निधनाची बातमी खोटी असल्याचं म्हटलं होतं. "तिसऱ्या पंचांनी त्याला परत पाठवलं आहे. तो जिवंत आहे," असं म्हटलं होतं.

थक्क करणारी आकडेवारी

झिम्बाब्वेच्या या माजी कर्णधाराने 65 कसोटी आणि 189 एकदिवसीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केलं. आजच्या घडीलाही हीथ स्ट्रीक कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये झिम्बाब्वेसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याच्या नावावर कसोटीमध्ये 216 आणि एकदिवसीय सामन्यात 239 विकेट्स आहेत. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 100 बळी घेणारा स्ट्रीक हा झिम्बाब्वेचा पहिला क्रिकेटपटू ठरला. 100 कसोटी बळी आणि 1000 कसोटी धावांची दुहेरी कामगिरी करणारा तो झिम्बाब्वेचा एकमेव  क्रिकेटपटू आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये 2000 धावा आणि 200 बळी घेणाराही तो झिम्बाब्वेचा एकमेव खेळाडू आहे.

कर्णधार अन् ऐतिहासिक कामगिरी

हीथ स्ट्रीकने कसोटीमध्ये एकूण 1990 धावा केल्या असून 127 वर नाबाद हा त्याचा सर्वोत्तम स्कोअर आहे. वनडेत 28.29 च्या सरासरीने त्याने 2943 धावा केल्या आहेत. स्ट्रीकने 1993 मध्ये कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर 2000 मध्ये संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. हीथ स्ट्रीकच्या नेतृत्वाखालीच 2001 मध्ये न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका झिम्बाब्वेने 2-1 अशा फरकाने जिंकली. झिम्बाब्वेने पहिल्यांदाच परदेशात कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला.