कानपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात २९ ऑक्टोबरला तिसरा आणि निर्णायक वनडे सामना होणार आहे. कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियममध्ये पहिल्यांदा डे-नाईट सामना खेळवला जाणार आहे.
हे मैदाना टीम इंडियासाठी आतापर्यंत लकी ठरणार आहे. टीम इंडियाने ५००वा कसोटी सामनाही याच मैदानावर खेळला होता. ग्रीनपार्क स्टेडियमवर भारतीय संघाने १३ वनडे सामने खेळलेत. त्यातील ९ सामन्यांत भारताने विजय मिळवला. तर चार सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला.
ग्रीनपार्कवर सगळ्यात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकरचा पहिला नंबर लागतो. त्याने ८ वनडेत ३४२ धावा केल्यात. यात १०० ही त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे. दुसऱ्या स्थानावर विनोद कांबळी आहे. त्याने ४ डावांत २१७ धावा केल्या. या यादीत भारताचा सलामीवीर रोहित शर्मा पाचव्या स्थानी आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.