मुंबई : टीम इंडियाचा गब्बर सलामीवीर शिखर धवनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात बोटाला दुखापत झाली. त्याच्या बोटाला फ्रॅक्चर असल्याचं समोर आल्यानंतर भारतीय टीमच्या चिंता वाढल्या. त्यामुळे धवनला वर्ल्डकपमधून ३ आठवडे मुकावे लागणार आहे. त्यामुळे धवनच्या जागेवर कोणाला संधी द्यायाची यावर चर्चा सुरु होती. अखेर धवनच्या जागी टीम इंडियाचा युवा खेळाडू ऋषभ पंतला संधी मिळाली आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
टीम इंडियाचा मीडिया मॅनेजरने अधिकृत माहिती दिली की, 'शिखर धवनवर डॉक्टरांकडून उपचार केले जात आहे. दुखापतीनंतर देखील धवन इंग्लंडमध्येच राहणार आहे. त्याच्या दुखापतीवर बारीक लक्ष ठेवण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंट घेतला आहे. सुरुवातीला त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर असल्याचे समजले होते.' परंतु त्याच्या हाताच्या मागील भागाला दुखापत झाल्याचे समजले.
धवनला झालेल्या दुखापतीमुळे त्याला आता पुढील काही सामन्यांसाठी मुकावे लागणार आहे. अफगाणिस्तान विरुद्ध २२ जून रोजी मॅच होणार आहे. या मॅचपर्यंत धवन खेळण्यासाठी तयार होईल. असा आशावाद टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने व्यक्त केला आहे.
ब्रिटनमध्ये बीसीसीआयचे एक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली. ते म्हणाले की, 'टीम मॅनेजमेंटच्या मते धवन मॅचविनर खेळाडू आहे. त्याला पुढील मॅचसाठी फीट होण्यासाठी संधी द्यायला हवी. इथे त्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊ शकते. तसेच संपूर्ण टीमला तो फीट होईल अशी खात्री आहे.',
अफगाणिस्तान विरुद्धच्या मॅचसाठी आजपासून (१२ जून) १० दिवस बाकी आहेत. अफगाणिस्तान विरुद्धच्या मॅचनंतर टीम इंडियाचा सामना वेस्टइंडिज विरुद्ध होणार आहे. त्यामुळे धवन जर अफगाणिस्तान विरुद्धच्या मॅचसाठी फीट झाला नाहीतर निदान वेस्टइंडिज विरुद्धच्या मॅचपर्यंत तरी फीट व्हावा अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. टीम इंडियाचा वेस्टइंडिज विरुद्ध सामना २७ जूनला होणार आहे.
टीम इंडियामध्ये धवनच्या जागी ऋषभ पंतचा समावेश करण्यात आला आहे. ऋषभ पंत बुधवारी इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे. पंरतु टीम मॅनेजमेंट धवनच्या खेळण्याबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत पंतला अंतिम-१५ मध्ये स्थान देता येणार नाही.