मुंबई : वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालिका संपली आहे. यासह, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. डब्ल्यूटीसीच्या नवीन सीझनच्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया अव्वल ठरली आहे. गेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दरम्यान ही टीम इंडिया बऱ्याच काळापासून अव्वलस्थानी होती. पण संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना गमावला.
भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 गुणांच्या गुणतालिकेत अव्वल आहे, कारण टीम इंडियाने एक सामना जिंकला आहे, तर एक सामना अनिर्णित केला आहे. दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा संघ आहे, ज्याने एक सामना जिंकला. तिसऱ्या स्थानावर विंडीज संघ आहे, ज्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत विजयाचे खाते उघडले आहे. इंग्लंड संघ चौथ्या स्थानावर आहे, जो भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. डब्ल्यूटीसीच्या या नवीन फेरीत इंग्लंडला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही.
भारतीय संघाचे सध्या 14 गुण आहेत. जर स्लो ओव्हर रेट पेनल्टी नसती तर टीम इंडियाच्या खात्यात 16 गुण राहिले असते. कारण दोन्ही संघांना ड्रॉ सामन्यासाठी प्रत्येकी 4 गुण मिळतात आणि भारतालाही चार गुण मिळवायचे होते, पण इंग्लंड आणि भारत या दोघांनी पहिली कसोटीत स्लो ओव्हर रेटमुळे फटका बसला. पाकिस्तानच्या खात्यात 12 गुण आहेत आणि तेवढेच गुण वेस्ट इंडिज संघाच्या खात्यात आहेत. इंग्लंड संघाचे फक्त दोन गुण आहेत, कारण स्लो ओव्हर रेटमुळे दोन गुण वजा झाले आहेत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या सामन्यांमध्ये यावेळी सामना जिंकण्यावर गुण निश्चित केले गेले आहेत. शेवटच्या वेळी मालिकेनुसार पॉइंट सिस्टीम तयार करण्यात आली होती, जी नंतर कोरोना विषाणूच्या साथीमुळे विजयाच्या टक्केवारीत बदलावी लागली. या डब्ल्यूटीसी फेरीत, सामना जिंकण्यासाठी 12 गुण, टायसाठी 6-6 गुण, ड्रॉसाठी 4-4 गुण. सामना गमावणाऱ्या संघाला एकही गुण मिळणार नाही आणि जर स्लो ओव्हर रेट आढळला तर 2 गुण वजा केले जातील.