मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चेन्नईचं नेतृत्व रविंद्र जडेजानं पुन्हा एकदा धोनीकडे दिलं. त्यानंतर क्रिकेटप्रेमी आणि स्टेडियममध्ये लोकांनी आनंद साजरा केला. धोनीकडे नेतृत्व येताच चेन्नईनं पहिला सामना जिंकला. हैदराबाद विरुद्धचा सामना चेन्नईनं जिंकला. धोनीनं पुन्हा यशस्वी कर्णधार असल्याचं संपूर्ण जगाला दाखवून दिलं.
धोनीने चेन्नईची धुरा सांभाळल्यानंतर पॉईंट टेबलमध्ये बदल झाला आहे. हैदराबाद टीमला पराभवाचा सामना करावा लागल्या तिसऱ्या स्थानावरून थेट घसरगुंडी सुरू झाली. तर चेन्नईची गाडी आता सुसाट पळणार याची चर्चा रंगली आहे.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आलेल्या दोन नव्या टीम लखनऊ आणि गुजरातने चांगली कामगिरी केली आहे. गुजरात टीमने 9 पैकी 8 सामने जिंकून आपलं पहिल्या क्रमांकावर स्थान निश्चित केलं आहे. गुजरातचं नेतृत्व हार्दिक पांड्या करत आहे.
लखनऊचे नेतृत्व के एल राहुल करत आहे. के एल राहुलने 10 पैकी 7 सामने जिंकले असून दुसरं स्थान निश्चित केलं आहे. तिसऱ्या स्थानावर राजस्थान टीम आहे. चौथ्या स्थानावर हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली आणि पंजाब अशी क्रमवारी आहे.
चेन्नईनं आतापर्यंत झालेल्या सामन्यात 9 पैकी 3 सामने जिंकले असून 9 व्या क्रमांकावर आहे. चेन्नई प्ले ऑफपर्यंत पोहोचणार की नाही याची उत्सुकता आहे. धोनीने कर्णधारपदाची धुरा हाती घेतल्यानंतर प्लेऑफपर्यंत पोहोचण्याची शक्यता अधिक असल्याची चर्चा आहे.