IPL 2023: 'मला धक्काच बसला'; अंपायरवर गंभीर आरोप करत 'या' खेळाडूने वळवल्या नजरा

IPL 2023 CSK vs RR: आयपीएलच्या यंदाच्या हंगामात परदेशी खेळाडूंपेक्षा जास्त चर्चा भारतीय खेळाडूंचीच सुरु आहे. नव्या खेळाडूंनी एकिकडे मैदान गाजवणं सुरु ठेवलेलं असतानाच दिग्गज खेळाडूही हम किसी से कम नही, अशाच भूमिकेत दिसत आहेत.   

Updated: Apr 13, 2023, 07:40 PM IST
IPL 2023: 'मला धक्काच बसला'; अंपायरवर गंभीर आरोप करत 'या' खेळाडूने वळवल्या नजरा  title=
IPL 2023 News R Ashwin Statement on upmires action during CSK vs RR match

IPL 2023 CSK vs RR: आयपीएल सुरु होऊन आता काही दिवस उलटलेले असतानाच या स्पर्धेला खरी रंगत येण्यास सुरुवात झाली आहे. अनेक संघांच्या आकडेवारीमध्ये होणारे चढ उतार पाहता संघांना आता गुणतालिकेमध्ये मिळणारी स्थानही बदलण्यास सुरुवात झाली आहे. इतकंच काय तर, आता स्पर्धेतील चुरस वाढली आहे. या साऱ्यामध्ये प्रचंड चर्चा होतेय ती म्हणजे IPL सामन्यांदरम्यान होणाऱ्या controversies ची. यामध्ये सध्या सर्वांच्याच तोंडी असणारं नाव आहे रविचंद्रन अश्विनचं. 

नुकत्याच पार पडलेल्या राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स (CSK) या सामन्यात पंचांनी दोन्ही संघांचं मत विचारात न घेता मैदानातील दवामुळं स्वत:हूनच चेंडू बदलण्याचा परस्पर निर्णय घेतला. बुधवारी चेन्नईत झालेल्या या सामन्यादरम्यान मैदानावर बऱ्याच प्रमाणात दवामुळं अडचणी निर्माण होत होत्या. ज्यामुळं सामन्याच्या दुसऱ्या सत्रात पंचांनी परस्पर चेंडू बदलला आणि त्यांच्या या निर्णयानं अश्विनला धक्काच बसला. 

पंचांच्या निर्णयावर अश्विन नाराज 

दवामुळं अतिशय अडचणी होऊनही पंच परस्परच चेंडू बदलण्याचा निर्णय घेतात हे आपण याआधी कधीच पाहिलं नसल्याचं म्हणत अश्विननं या संपूर्ण प्रकारावर प्रतिक्रिया दिली. 'मला आश्चर्यच वाटलं की दवामुळं त्यांनी स्वत:च्याच मतानं चेंडू बदलला. हे असं काहीतरी यापूर्वी कधीच घडल नव्हतं. प्रामाणिकपणेच सांगावं, तर यंदाच्या आयपीएलदरम्यान घेण्यात आलेले काही निर्णय मला पटलेले नाहीत', असं तो स्पष्टच म्हणाला. 

हेसुद्धा वाचा : RR vs CSK : मुंबईकर अजिंक्य रहाणेला धमकावणं अश्विनला पडलं भारी; मंकडिंगला दिलं प्रत्युत्तर

 

सामनावीर ठरलेल्या अश्विननं लगेचच आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण देत या निर्णयांचा लगेचच चांगला आणि वाईट अर्थ काढला जाऊ शकतो, त्यामुळं त्यामध्ये संतुलन राखलं जाणं गरजेचं होतं असंही म्हटलं. आमच्या संघाची गोलंदाजी सुरु असताना अचानकच पंचांनी चेंडू बदलला आणि त्यांना विचारलं असता, आम्ही असे निर्णय घेऊ शकतो असं ते म्हणाल्याचं अश्विननं सांगितलं. सध्याच्या घडीला आपणच आपल्या खेळाचा आनंद घेत असल्याचं सांगत अश्विननं आपण या साऱ्याचा जास्त विचारही करत नसल्याचं म्हटलं.