मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक टीमना जास्तीत जास्त 5 जुन्या खेळाडूंना कायम ठेवता येणार आहे. हे पाच खेळाडू वगळता इतर खेळाडूंचा पुन्हा एकदा लिलाव होणार आहे. आयपीएलच्या कार्यकारणीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
जास्तीत जास्त भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे 3 खेळाडू
जास्तीत जास्त 2 आंतरराष्ट्रीय खेळाडू
जास्तीत जास्त 2 भारतीय खेळाडू (आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेले)
2015 सालच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थानच्या टीमवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा या दोन्ही टीम आयपीएलमध्ये दिसतील. या टीमनाही 2015 मध्ये त्यांच्या टीमकडून खेळणाऱ्या 5 खेळाडूंना टीममध्ये कायम ठेवता येणार आहे.
या निर्णयामुळे बेन स्टोक्स आणि जेसन रॉय या दोन खेळाडूंना पुन्हा एकदा लिलावामध्ये उतरावं लागणार आहे.
आयपीएलच्या प्रसारणाचे अधिकार जास्त पैशांना विकले गेल्याचा फायदा फ्रॅचायजी मालकांनाही झाला आहे. फ्रॅचायजी मालक लिलावात आता 80 कोटी रुपये खर्च करू शकतील.
मागच्या वर्षीपर्यंत ही रक्कम 66 कोटी रुपये एवढी होती. 2019मध्ये टीमना 82 कोटी रुपये आणि 2020मध्ये 85 कोटी रुपये खर्च करता येणार आहेत.
टीमनी कायम ठेवलेल्या पाच खेळाडूंनाही फायदा होणार आहे. टीमनी कायम ठेवलेल्या पहिल्या खेळाडूला 12.5 कोटी रुपये, दुसऱ्या खेळाडूला 9.5 कोटी रुपये, तिसऱ्या खेळाडूला 7.5 कोटी रुपये, चौथ्या खेळाडूला 5.5 कोटी रुपये आणि पाचव्या खेळाडूला 4 कोटी रुपये मिळणार आहेत.
एखाद्या टीमनं पाचऐवजी फक्त तीनच खेळाडू कायम ठेवले तर लिलावावेळी त्यांना 33 कोटी रुपये कमी खर्च करावे लागणार आहेत. (15 कोटी, 11 कोटी आणि 7 कोटी तीन खेळाडूंचे)
टीमनं दोन खेळाडू कायम ठेवले तर लिलावावेळी त्यांना 21 कोटी रुपये कमी खर्च करावे लागणार(12.5 कोटी आणि 8.5 कोटी रुपये)
टीमनं फक्त एकच खेळाडू कायम ठेवला तर त्यांना लिलावामध्ये 12.5 कोटी रुपये कमी खर्च करता येतील.
टीमनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळणारा खेळाडू संघात कायम ठेवला तर लिलावामध्ये 3 कोटी रुपये कमी खर्च करता येतील.
लिलावामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंना पाच भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. 2 कोटी, 1.5 कोटी, 1 कोटी, 75 लाख आणि 50 लाख रुपये एवढी बेस प्राईज या खेळाडूंसाठी ठेवण्यात आली आहे.
प्रत्येक फ्रँचायजी टीममध्ये जास्तीत जास्त 25 खेळाडूच ठेवू शकते. याआधी टीममध्ये 27 खेळाडू ठेवायला परवानगी होती. जास्तीत जास्त 8 परदेशी खेळाडू टीममध्ये असतील. याआधी 9 परदेशी खेळाडूंना टीममध्ये ठेवायची परवानगी होती.