खार जिमखानाकडून प्रसिद्ध क्रिकेटरचं सदस्यत्व रद्द, वडिलांवर धर्मपरिवर्तनाचे आरोप!

 Jemimah Rodrigues Latest News : जेमिमाच्या वडिलांवर तिच्या सदस्यत्वाचा वापर हा धार्मिक कृत्यासाठी केल्याचा आरोप खार जिमखान्याच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे. 

पुजा पवार | Updated: Oct 22, 2024, 12:32 PM IST
खार जिमखानाकडून प्रसिद्ध क्रिकेटरचं सदस्यत्व रद्द, वडिलांवर धर्मपरिवर्तनाचे आरोप! title=
(Photo Credit : Social Media)

 Jemimah Rodrigues Latest News : भारताची प्रसिद्ध महिला क्रिकेटर आणि टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरचा भाग असलेली जेमिमा रॉड्रिग्ज हिच्यावर मुंबईतील सर्वात जुन्या खार जिमखाना क्लबने कारवाई केली आहे. खार जिमखाना क्लबने तिचं सदस्यत्व तात्काळ रद्द केलं असून ही कारवाई तिच्या वडिलांमुळे झाल्याचे सांगण्यात येते. जेमिमाच्या वडिलांवर तिच्या सदस्यत्वाचा वापर हा धार्मिक कृत्यासाठी केल्याचा आरोप खार जिमखान्याच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे. 

जेमिमा रॉड्रिग्ज टीम इंडियातील एक स्टार क्रिकेटर असून ती मागील अनेक वर्षांपासून खार जिमखाना क्लबची सदस्य आहे. खार जिमखाऱ्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेमिमाचे वडील क्लब परिसराचा वापरत धार्मिक कार्यासाठी करत होते, त्यांच्यावर काहींनी या कार्यक्रमात धर्मपरिवर्तन केल्याचे आरोप देखील लावले. त्यामुळे जेमिमावर ही कारवाई करण्यात आली. रविवारी खार जिमखाना क्लबच्या वार्षिक सर्व साधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. 

जेमिमा रॉड्रिग्सचे तीन वर्षांचे सदस्यत्व रद्द : 

जेमिमावर करण्यात आलेल्या कारवाईबद्दल बोलताना खार जिमखानाचे अध्यक्ष विवेक देवनानी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, '20 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या सर्वसाधना सभेत उपस्थित असलेल्या सदस्यांनी मंजूर केलेल्या ठरावानुसार क्रिकेटर जेमिमा रॉड्रिग्स हिचे तीन वर्षांचे मानद सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला'.

हेही वाचा : कृष्णाचे भजन गात होता विराट तर टाळ्या वाजवत दंग झाली अनुष्का; मुंबईमधील कार्यक्रमाचा Video पाहाच

 

जिमखान्याच्या सभागृहात सुरु होते धार्मिक कार्यक्रम : 

खार जिमखान्याने केलेल्या कारवाई आणि आरोपांवर जेमिमा आणि तिच्या वडिलांशी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. खार जिमखाना व्यवस्थापकीय समिती सदस्य शिव मल्होत्रा ​​यांनी सांगितले की, 'आम्हाला कळले की जेमिमा रॉड्रिग्जचे वडील हे 'ब्रदर मॅन्युएल मिनिस्ट्रीज' नावाच्या संस्थेशी संलग्न होते. त्यांनी जवळपास दीड वर्षासाठी खार जिमखान्या सभागृह बुक केले होते आणि 35 कार्यक्रम आयोजित केले. तिथे काय चालले होते हे सर्वांना माहीत आहे. आम्ही देशभरात धर्मांतराबद्दल ऐकतो, पण ते आमच्या नाकाखाली होत आहे.  खार जिमखान्याच्या उपविधी नियम 4A नुसार, खार जिमखाना कोणत्याही धार्मिक कार्याला परवानगी देत ​​नाही', असे मल्होत्रा ​​म्हणाले.

'अंधारी खोली आणि ट्रान्स म्युझिक' : 

खार जिमखाना क्लबचे माजी अध्यक्ष नितीन गाडेकर म्हणाले की, त्यांना एकाने जेमिमाचे वडील आयोजित करत असलेल्या कार्यक्रमात धर्म परिवर्तन सारख्या गोष्टी होत असल्याची माहिती दिली. तेव्हा आम्ही तेथे पोहोचलो तेव्हा आम्ही पाहिलं की तेथे अंधार होता आणि ट्रान्स म्युझिक वाजत होते आणि एक महिला 'तो आम्हाला वाचवायला येत आहे' असं म्हणत होती. मला आश्चर्य वाटलं की जिमखाना अशा कार्यक्रमांना परवानगी कशी देऊ शकते. आम्ही याचा सर्व साधारण सभेत विरोध केला. आणि मग उपस्थित सदस्यांनी मिळून जेमिमाचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय  घेतला.