Sydney Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Sydney Test) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर व्हावे लागले आहे. रोहित शर्माच्या जागी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे सिडनी कसोटीत भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. या घटनेनंतर रोहित शर्मा लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करेल, असा अंदाज अनेक दिग्गजांनी बांधला. यावर अनेक चर्चाही रंगल्या. आता यावर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने सध्या निवृत्ती घेण्यावर स्वतः उत्तर दिले आहे.
टीम इंडियाचा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार रोहित शर्माने रविवारी सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लंच ब्रेक दरम्यान मोठा खुलासा केला. रोहित शर्माने स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना सांगितले की, "मी निवृत्ती घेत नाही आहे, मी फक्त संघाच्या गरजा लक्षात घेऊन बाहेर बसलो आहे. मी निवडकर्त्यांना आणि प्रशिक्षकांना सांगितले की माझ्याकडून धावा होत नाहीत, त्यामुळे मी या सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. बाहेर लॅपटॉप, पेन आणि कागद घेऊन बसलेले लोक मी कधी निवृत्त होणार हे ठरवू शकत नाही. काय निर्णय घ्यायचा हे मला माहीत आहे. त्यामुळे ते माझ्या निवृत्तीबाबत निर्णय घेऊ शकत नाहीत."
रोहित शर्माने या वक्तव्याद्वारे निवृत्ती घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. सिडनी कसोटी सामन्यात कर्णधारपद आणि फलंदाजीतील खराब कामगिरीमुळे रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर व्हावे लागले होते. सिडनीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह नाणेफेकीसाठी मैदानात उतरला. सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत कर्णधार रोहित शर्माने 5 कसोटी डावात केवळ 31 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा पुढे म्हणाला, "मी कुठेही जात नाही. हा खेळ सोडण्याचा माझा विचार नाही. मी फॉर्ममध्ये नसल्यामुळेच मी बाहेर आहे. भविष्यात काय होईल हे तुम्हाला माहीत नाही. मी स्कोअर करणे सुरू करू शकतो, किंवा मी करू शकत नाही, परंतु मला खात्री आहे की मी परत येऊ शकेन."