India vs England: भारत आणि इंग्लंड संघ आता पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यासाठी धरमशाला येथे पोहोचले आहेत. 7 मार्चपासून दोन्ही संघांमध्ये पाचव्या कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. भारताने पाच सामन्यांची ही मालिका आधीच 3-1 ने जिंकली आहे. त्यामुळे भारतासाठी हा सामना फक्त औपचारिक असणार आहे. पण भारतीय संघ हा सामना जिंकत इंग्लंडवर मोठ्या विजयाच्या प्रयत्नात असेल. दरम्यान या सामन्याआधी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रश्नांना मोकळेपणाने उत्तरं दिली. तसंच इंग्लंडचा खेळाडू बेन डकेटला सणसणीत उत्तर देत तोंड बंद केलं.
रोहित शर्माला यावेळी बेन डकेटने यशस्वी जैसवालसंबंधी केलेल्या विधानासंबंधी विचारण्यात आलं. इंग्लंड संघाला यशस्वीच्या दमदार खेळीचं श्रेय मिळालं पाहिजे असं बेन डकेटचं म्हणणं होतं. त्यावर रोहित शर्माने बेन डकेटसह सर्वांना ऋषभ पंतची आठवण करुन दिली. त्यांनी कदाचित ऋ।भ पंतला खेळताना पाहिलं नसेल, त्यामुळेच अशी कमेंट करत असावेत असा टोला रोहित शर्माने लगावला आहे.
"आमच्या संघात ऋषभ पंत नावाचा खेळाडू होता, कदाचित बेन डकेटने त्याला खेळताना पाहिलं नसेल," असं रोहित शर्मा म्हणाला.
Rohit Sharma said, "there was a guy named Rishabh Pant in our team, probably Ben Duckett hasn't seen him playing". (On Duckett's statement of Jaiswal learning from England). pic.twitter.com/pp5wvmF9iq
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 6, 2024
कसोटी मालिकेत यशस्वी जैसवाल भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. यशस्वीने 4 सामन्यात 94.57 ची सरासरी आणि 78.63 च्या स्ट्राइक रेटने 655 धावा केल्या आहेत. राजकोटमध्ये यशस्वीने तुफान खेळी केली. यावर भाष्य करताना बेन डकेटने म्हटलं होतं की, "या मालिकेत यशस्वी ज्याप्रकारे खेळला आहे त्याचं श्रेय इंग्लंड संघाच्या बेझबॉल पद्धतीला दिलं पाहिजे. त्यामुळेच यशस्वी असं खेळण्यास प्रवृत्त झाला".
"जेव्हा तुम्ही विरोधी संघातील खेळाडूंना असं खेळताना पाहता तेव्हा नेहमीप्रमाणे कसोटी न खेळता वेगळ्या पद्धतीने खेळत आहेत याचं श्रेय आपण घेतलं पाहिजे असं वाटतं," असं डकेट म्हणाला होता.
दरम्यान डकेटच्या मताशी असहमती दर्शवणारा रोहित शर्मा एकमेव नाही. याआधी इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसननेही यावर टीका केली होती. "तो तुमच्याकडून शिकलेला नाही. त्याने मोठं होताना कठीण परिस्थितीचा सामना करत हे सगळं शिकलं आहे. तुम्ही त्याच्याकडून पाहून शिकलं पाहिजे. तुमचंही थोडं तरी आत्मपरीक्षण सुरु असेल अशी आशा आहे. अन्यथा तुम्ही टीका करण्याचं काही कारण नाही," असं तो म्हणाला होता.