चेन्नई : भारताचा क्रिकेटपटू सुब्रमण्यम बद्रीनाथनं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तामीळनाडूचा मधल्या फळीतील बॅट्समन बद्रीनाथनं भारताकडून २ टेस्ट, ७ वनडे आणि १ टी-२० मॅच खेळली. या एकमेव टी-२०मध्ये बद्रीनाथला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं होतं. पण या मॅचनंतर बद्रीनाथला टीममध्ये स्थान मिळालं नाही. वेस्ट इंडिजविरुद्ध २०११ साली त्रिनिदादमध्ये ही मॅच झाली होती. या मॅचमध्ये बद्रीनाथनं ४३ रनची खेळी केली होती. भारतानं ही मॅच १६ रननी जिंकली होती. २ टेस्ट मॅचच्या ३ इनिंगमध्ये बद्रीनाथनं ६३ रन केले. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश होता. तर ७ वनडेमध्ये बद्रीनाथला १५.८ च्या सरासरीनं ७९ रन करता आल्या.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बद्रीनाथला यश मिळालं नसलं तरी प्रथम श्रेणी क्रिकेटच्या १४५ मॅचमध्ये ५४.४९ च्या सरासरीनं त्यानं १०,२४५ रन केले. यामध्ये ३२ शतकांचा समावेश आहे.