मुंबई : सचिन एप्रिल महिन्यात ४४ वर्षांचा झाला. त्याचबरोबर क्रिकेटमधील त्याच्या कारकीर्द २४ वर्षांची होती. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी ४४ फूट लांब आणि २४ फूट रुंद अशी भव्य रांगोळी एप्रिल महिन्यात साकारली. ही संकल्पना सत्यात उतरवणारे सचिनचे चाहते कलाकार म्हणजे अभिषेक साटम आणि संदिप बोबडे. ही रांगोळी इतकी सुंदर होती की तिची दखल ‘इंडिया बुक रेकॉर्ड’नं घेतली आणि या रांगोळीच्या नावे ‘युनिक बर्थडे गिफ्ट’ आणि ‘युनिक रांगोळी’ अशा दोन विक्रमांची नोंद झाली.
गेल्या वर्षभरात नोंदवलेल्या १०० विक्रमांमध्ये या रांगोळीचा देखील समावेश आहे. २४ एप्रिल २०१७ मध्ये सचिनच्या वाढदिवसानिमित्त परळच्या आर.एम.भट्ट शाळेच्या पटांगणात ही सुंदर रांगोळी साकारण्यात आली. या दोघांनी दोन दिवस घेतलेल्या परिश्रमातून ही कलाकृती साकारली गेली. या रांगोळीची ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’, ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’साठी नोंदणी करण्यात आली आहे.