World Cup Semifinal qualification scenario : वर्ल्ड कपला धमाकेदार सुरूवात झाल्यानंतर आता सर्व संघांनी पाच सामने खेळले आहेत. पाच सामन्यानंतर टीम इंडिया 10 अंकासह पाईंट्स टेबलमध्ये (World Cup Points Table) अव्वल स्थानी विराजमान झालीये. तर दुसरीकडे साऊथ अफ्रिका 4 सामन्यातील दिमाखदार विजयासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर न्यूझीलंडने देखील 5 सामन्यात 4 विजय प्राप्त केलेत. त्यामुळे हे तिन्ही संघ सेमीफायनलच्या रेसमध्ये असतील, हे आता जवळजवळ निश्चित झालंय. त्यामुळे चौथा संघ कोणता? ऑस्ट्रेलिया की पाकिस्तान? जर उलटफेर झाला तर अफगाणिस्तान पहिल्यांदा सेमीफायनल गाठणार का? असा सवाल विचारला जातोय. या सर्व समीकरणामुळे वर्ल्ड कपची चुरस आणखीच वाढल्याचं दिसतंय. अशातच आता टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) याने मोठं वक्तव्य केलंय.
वर्ल्ड कपमधील प्रत्येक सामन्यानंतर पाईंट्स टेबलमध्ये मोठे बदल होत आहेत. भारत, साऊथ अफ्रिका आणि न्यूझीलंड यांनी सेमीफायनलसाठी आपल्या जागा तयार ठेवल्या आहेत. त्यामुळे आता चौथ्या जागेची चुरस निर्माण झालीये. त्यामुळे चौथ्या स्थानी कोण असणार? खरं पहायला गेलं तर नेट रनरेटवर सर्व खेळ असेल. जर भारत, साऊथ अफ्रिका किंवा न्यूझीलंडपैकी कोणताही एक संघ क्वालिफाय झाला नाही तर मोठा धक्का असेल, असं शिखर धवन याने म्हटलं आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचे विचार स्पष्ट करा, असं शिखर धवनने म्हटलं आहे.
Every World Cup match is reshaping the points table, with India, SA, and New Zealand securing their spots in the semis. Now, the spotlight is on the race for the 4th spot, demanding keen attention to net run rate. Will be shocking if one of India-NZ-SA doesn’t qualify for SF.… pic.twitter.com/Bj2tMAqgah
— Shikhar Dhawan (@SDhawan25) October 25, 2023
न्यूझीलंड, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया ही तिन्ही प्रमुख आव्हानं टीम इंडियाने पार केली आहेत. त्यामुळे आता उरलं इंग्लंड आणि साऊथ अफ्रिका... इंग्लंडची परिस्थिती पाहता, भारतासमोर इंग्लंड तगडं आव्हान देऊ शकत नाही, अशी शक्यता आहे. मात्र, डिफेन्डिंग चॅम्पियनला हलक्यात घेणं धोक्याचं ठरेल. तर दक्षिण आफ्रिकाविरुद्धचा 5 नोव्हेंबरचा सामना वर्ल्ड कपच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल. टीम इंडियाकडे आता 10 पॉइंट्स आहेत. सेमीफायनल गाठण्यासाठी कमीतकमी 14 पॉइंट्सची गरज असेल. त्यामुळे आता नेदरलँड आणि श्रीलंका या दोन लिंबुटिंबू संघांविरुद्ध जिंकलं तरी टीम इंडियाचं सेमीफायनल तिकीट पक्कं होऊन जाईल. मात्र, सर्व सामने जिंकण्याचा मानस टीम इंडियाचं असेल.
दरम्यान, 8 ऑक्टोबर विरुद्ध ऑस्ट्रेलियाविरुद्घ चेन्नईत भारतीय संघाने 6 गडी राखून विजय मिळवला होता. त्यानंतर 11 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघ 8 गडी राखून विजयी झाला होता. तर पाकिस्तानविरुद्ध 14 ऑक्टोबरला 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता. त्याचबरोबर 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेशला 7 विकेट्सने लोळवलं होतं. तर 20 वर्षानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडला धुळ चारून विजयाचा पंचनामा केलाय. त्यानंतर आता गोऱ्या साहेबांना पाणी पाजण्यासाठी टीम इंडिया तयार असेल.