मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असतो. नुकतेच त्याने एक पत्र इन्स्टाग्रामवर शेअर केले. हे पत्र त्याला एका सहा वर्षाच्या मुलीने लिहिले आहे. तिचे नाव तारा असून तिने ‘सचिन- अ बिलिअन ड्रीम' हा सिनेमा बघितला. तिला तो अतिशय आवडला आणि म्हणूनच तिने पत्राद्वारे निरागसपणे सचिनला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
ताराने लिहिले की, ‘प्रिय सचिन काका, सारा दीदीसारखं माझं नाव तारा आहे. पण मी ६ वर्षांची आहे. नुकताच मी तुमचा सिनेमा पाहिला. हा सिनेमा मला फार आवडला. सिनेमात तुम्ही जी मस्ती करता ते पाहून मी खूप हसले. पण तुमचा शेवटचा सामना पाहून खूप रडले. सचिन काका मी तुम्हाला, सारा दीदी, अर्जुन दादा आणि अंजली काकूला भेटू इच्छिते. तुम्ही मला भेटाल का?’
ताराच्या या पत्राला उत्तर देताना सचिनने लिहिले की, 'हाय तारा, तुझं हे पत्र वाचून मला फार आनंद झाला. तुला हा सिनेमा आवडला याचा मला आनंद आहे. सतत हसत राहा.'