नवी दिल्ली : श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये टीम इंडियाची हालत अतिशय खराब.
७४ धावांमध्ये संघ ५ विकेट गमावून बसला होता. ओपनर फलंदाज केएल राहुल आणि टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आपलं खातं देखील उघडू शकले नाहीत. एवढंच नाही तर टीम इंडियाच्या संघातर्फे चेतेश्वर पुजाराच्या व्यतिरिक्त कुणीही दोन अंकी धावा करू शकले नाहीत. चेतेश्वर पुजाराच फक्त श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर टिकून राहिला. त्याने आतापर्यंत फक्त ४७ धावा केल्या आहेत.
ईडन गार्डनच्या पिचवर भारतीय फलंदाज किती दबावा खाली खेळत आहेत याचा अंदाज आला. लकलमने ११ ओव्हरपैकी ९ ओव्हर मेडन फेकले आहेत. त्यासोबतच ३ विकेट घेतले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संघ ७४ धावांवर ५ विकेट गमावून बसला होता. आणि त्यानंतर पावसाने जेवणानंतरचा खेळ होऊ दिला नाही. मात्र या सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना धुतलं होतं हे नक्की.
कोलकातामध्ये टीम इंडियाचे हे प्रदर्शन बघून चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. मात्र संघाचा निवृत्त गोलंदाज आशीष नेहरा मात्र प्रचंड खूष दिसत आहे. आशीष नेहराच्या आनंदाचं कारण टीम इंडियाचं प्रदर्शन नसून नेहरा कोलाकाताच्या पिचमुळे प्रचंड खूष आहे. टीम इंडियाला जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा करायचा आहे. आणि यासाठी अशा पद्धतीच्या पिचवर खेळण्याचा अनुभव त्यांच्यासाठी नक्कीच फायदेशीर असू शकतो.
नेहरा म्हणाला की, मला नाही वाटत दक्षिण आफ्रिका भारताला खेळण्यासाठी साधा पिच देईल. त्यामुळे इथे असे विकेट जाणं हे भारतासाठी चांगलं आहे. त्यांनी सांगितलं की, भारताला दक्षिण आफ्रिकेच्या पिचवर गवत मिळणार आहे.