मुंबई : बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना हा भारतीय संघाने जिंकला असून, एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड येथे खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्या जयमान ऑस्ट्रेलियाला १३७ धावांनी पराभूत करत भारतीय संघाने या कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी सरशी घेतली आहे.
१५० व्या कसोटी सामन्यावर विजयी मोहोर उमटवत भारतीय संघाने एका ऐतिहासिक विजयाच्या दिशेने पावलं उचलली आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये एकाच कसोटी मालिकेत दोन सामने जिंकण्याची भारताची ही दुसरी वेळ असल्यामुळे हा विजय खऱ्या अर्थाने अतिशय महत्त्वाचा ठरत आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दिलेल्या ३९९ धावांचा पाठलाग करत ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात उतरला. पण, भारतीय गोलंदाजांच्या फिरकी आणि वेगवान गोलंदाजीचा मारा काही त्यांना झेपला नाही.
पाहता पाहता सलामीवीर फिंच तंबूत परतला आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची परतवारी सुरुच राहिली. संघाचा डाव सावरण्यासाठी शॉन मार्शने संयमी खेळ करण्याता प्रयत्न केला. पण, त्याच्या या प्रयत्नांनाही बुमराहने अपयशी ठरवलं. चौथ्या दिवशी चहापानानंतर ऑस्ट्रेलियन संघाच्या विजयाच्या आशा अधिकत धुसर झाल्या. त्याच दिवशी पॅट कमिन्स याच्या अर्धशतकी खेळीमुळे या आशांना नवसंजीवनी मिळाली.
INDIA LEAD SERIES 2-1!
With the wicket of Nathan Lyon, Ishant Sharma wraps Australia up for 261, powering his side to a convincing 137-run win at the MCG.#AUSvIND SCORECARD https://t.co/XyVZQv8kRp pic.twitter.com/8o7GPf04yZ
— ICC (@ICC) December 30, 2018
एकिकडून बुमराह, रवींद्र जडेजा आणि इशांत शर्मा यांच्या गोलंदाजीचा पारा होत असताना आणि विराट कोहली संघाला कसा विजय मिळवून देता येईल याची रणनिती आखत असतानाच दुसरीकडे कमिन्स एकहाती खिंड लढवत होता. चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाचा संघ ८ बाद २५८ धावांवर होता. चौथ्या दिवशीच मैदानावर पावसाचं सावट होतं. पाचव्या दिवशी दोन्ही संघ मैदानावर येण्यासाठी तयार असतानाच पावसाने यजमानांच्या संघाला कौल दिला आणि खेळात व्यत्यय आला. पण, अखेर पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला आणि विजयी पताका उंचावण्याच्याच उद्देशाने मैदानात आलेल्या भारतीय संघाने अवघ्या पंधरा मिनिटांच्या खेळानंतरच ऑस्ट्रोलियाला २६१ धावांवर सर्वबाद करत १५० वा कसोटी सामना जिंकला.