विदर्भाने सलग दुसऱ्यांदा इराणी करंडक जिंकला

पहिल्या डावात विदर्भाने मिळवलेल्या ९५ धावांच्या आघाडीमुळे विदर्भाचा विजय झाला आहे.

Updated: Feb 16, 2019, 05:43 PM IST
विदर्भाने सलग दुसऱ्यांदा इराणी करंडक जिंकला title=

नागपूर : शेष भारत विरुद्ध विदर्भ यांच्यात सुरु असलेला सामन्यात विदर्भाचा विजय झाला आहे.  पहिल्या डावात विदर्भाने मिळवलेल्या ९५ धावांच्या आघाडीमुळे विदर्भाचा विजय झाला आहे. दोन वेळा सलग रणजी करंडक जिंकलेल्या विदर्भाने सलगपणे दुसऱ्यांदा इराणी करंडक जिंकला आहे. शेष भारताने विदर्भाला विजयासाठी २८० धावांचे आव्हान दिले होते. यामोबदल्यात विदर्भाने दुसऱ्या डावात  ५ बाद २६९ धावसंख्या असताना  डाव घोषित केला. 

 

विदर्भाकडून दुसऱ्या डावात सर्वाधिक ८७ धावांची खेळी गणेश सतिशने केली. त्या खालोखाल अथर्व तायडेने ७२, संजय रघुनाथने ४२ तर मोहित काळेने ३७ धावा केल्या. शेष भारताने विजयासाठी दिलेल्या २८० धावांचे पाठलाग करायला आलेल्या विदर्भाची वाईट सुरुवात झाली. पहिल्याच ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर कर्णधार फैज फजल ० धावांवर बाद झाला. त्यानंतर संजय रघुनाथ आणि अथर्व तायडे या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची मह्त्वपूर्ण भागीदारी केली. या भागीदारानी विदर्भाच्या डावाचा पाया रचला.      

शेष भारताचा पहिला डाव

याआधी नाणेफेक जिंकून शेष भारत संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेष भारताच्या संघाने पहिल्या डावात ३३० धावा उभारल्या. यात हनुमा विहारीने सर्वाधिक ११४  धावांची खेळी केली. तसेच मयांक अग्रवालने ९५ धावा उभारल्या. या दोघा फलंदाजांचा अपवाद वगळता कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करण्यापासून विदर्भाच्या गोलंदाजांनी रोखले. 

शेष भारताकडून दुसऱ्या विकेटसाठी मयांक अग्रवाल आणि  हनुमा विहारी यांच्यात सर्वाधिक १२५ धावांची भागीदारी झाली. विदर्भाकडून आदित्य सरवटे आणि अक्षय वाखरे या जोडीने  प्रत्येकी ३ तर, रणजीश गुरबानीने २ आणि यश ठाकूर आणि अक्षय कर्नेवार याने १ विकेट घेतला. 

विदर्भाचा पहिला डाव

पहिल्या  डावात शेष भारताने केलेल्या ३३० धावांचा पाठलाग करायला आलेल्या विदर्भाने प्रत्युतरात ४२५ धावा केल्या. आणि पहिल्या डावात विदर्भाने ९५ धावांची आघाडी घेतली.  विदर्भाच्या पहिल्या डावाची उत्तम सुरुवात झाली. फैज फजल आणि संजय रघुनाथ जोडीने पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली.

विदर्भाची धावसंख्या ५० असताना कर्णधार फैज फजल २७ धावा करुन बाद झाला. यानंतर ठराविक अंतराने विदर्भाचे विकेट जात होते. शेष भारताने दिलेल्या ३३० धावांचा टप्पा पार होतो की नाही असे वाटत होते. पण गरजेच्या वेळी अक्षय कर्नेवारने शतक लगावत आपल्या संघाला चांगल्या परिस्थितीत आणले. या खेळीमुळे सामन्यात विदर्भाने पुनरागमन केले. 

अक्षय कर्नेवारने १०२ धावांची खेळी केली. याखेळीमुळेच विदर्भाला पहिल्या डावात ९५ धावांची आघाडी घेता आली. कर्णेवारचा अपवाद वगळता विदर्भाकडून पहिल्या डावात संजय रघुनाथने ६५, गणेश सतिशने ४८ आणि विकेटकीपर अक्षय वाडकरने ७३ धावा केल्या. शेवटच्या काही फलंदाजांनी देखील उत्तम कामगिरी केली. अक्षय वाखरेने २० धावा केल्या. तर रणजिश गुरबानीने नाबाद २८ धावांची खेळी केली. विदर्भाचा संपुर्ण संघ ४२५ धावांवर गारद झाला.

शेष भारताचा दुसरा डाव

पहिल्या डावात शेष भारताने विदर्भाला ३३० धावांचे आव्हान दिले होते. प्र्त्तुतरादाखल ४२५ धावा केल्या. यामुळे शेष भारताला दुसऱ्या डावात विदर्भाकडून ९५ धावांचे आव्हान मिळाले. दुसऱ्या डावात खेळायला आलेल्या शेष भारताने ३ बाद ३७४ धावा असताना डाव घोषित केला.

पहिल्या डावात शतकी खेळी केलल्या हनुमा विहारीने दुसऱ्या डावात देखील  शतकी खेळी केली. त्यामुळे एका सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये शतकी खेळी करणारा हनुमा विहारी हा शिखर धवननंतर दुसराच खेळाडू ठरला आहे. हनुमा विहारीने दुसऱ्या डावात नाबाद १८० धावा केल्या. 

शेष भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांचा पहिला विकेट हा २५ धावांवर गेला. अनमोल प्रीत सिंह ६ धावावर बाद झाला. यानंतर ५ ओव्हनंतरच दुसरा झटका लागला. पहिल्या डावात ९५ धावांची खेळी केलेल्या मयांकला दुसऱ्या डावात विशेष काही करता आले नाही. मयांक २७ धावांवर बाद झाला. यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी मध्ये तिसऱ्या विकेटसाठी २२९ धावांची भागीदारी झाली. या भागीदारीने शेष भारत संघाच्या डावाला आकार दिला. ही भागीदारी आदितय सरवटेला यश आले. रहाणे ८७ धावा करुन बाद झाला. 

रहाणे बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या श्रेयस अय्यर सोबत विहारीने चौथ्या विकेटसाठी ९९ धावा जोडल्या. यादरम्यान श्रेयसने  आपले अर्धशतक लगावले. शेष भारत संघाचा ३ बाद ३७४ धावसंख्या असताना डाव घोषित केला. यामुळे हनुमा विहारी नाबाद १८० आणि श्रेयस अय्यर नाबाद ६१ धावांवर राहिले. विदर्भाकड़ून दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना आदित्य सरवटेने २ तर अक्षय वाखरेने १ विकेट मिळवला.