हैदराबाद : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हैदराबादमध्ये एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या टूर्नामेंटमध्ये एक विचित्र घटना घडल्याचं समोर आलं आहे.
एका स्थानिक टूर्नामेंटमध्ये बॉलिंग करणारा २३ वर्षीय खेळाडू अचानक जमिनीवर कोसळला. जमिनीवर कोसळलेल्या या तरुण खेळाडूचा मृत्यू झाला आहे.
मैदानात मॅच रंगात आलेली असताना हा प्रकार घडल्याने सर्वांनाच एक धक्का बसला आणि सर्वजण हादरुन गेले.
हैदराबादमधील बंजारा हिल्स परिसरात स्थानिक क्रिकेट मॅचेसचं आयोजन करण्यात आलं होतं. शुक्रवारी सुरु असलेल्या मॅचमध्ये २३ वर्षीय लॉयड अँथनी बॉलिंग करत होता.
दोन्ही टीम्सकडून मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मॅच रंगतदार अवस्थेत आली असतानाच बॉलिंग करणारा अँथनी मैदानात अचानक कोसळला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
यानंतर अँथनीला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
अँथनी हा एका कॉलेजमध्ये नोकरीस होता. आपल्या मित्रांसोबत क्रिकेट टूर्नामेंट खेळण्यासाठी तो आला होता.