Shane Warne च्या ऍम्ब्युलन्सजवळ असलेली 'ती' मिस्ट्री गर्ल कोण?

वॉर्नच्या निधनानंतर तीन दिवसांनी अॅम्ब्युलन्सजवळ दिसलेली एक महिला चर्चेत आली. 

Updated: Mar 8, 2022, 08:47 AM IST
Shane Warne च्या ऍम्ब्युलन्सजवळ असलेली 'ती' मिस्ट्री गर्ल कोण? title=

थायलंड : 4 मार्च रोजी ऑस्ट्रेलियाचा महान स्पिनर शेन वॉर्न याचं निधन झालं. थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असताना त्याच्या मृत्यूची बातमी आली. हार्ट अटॅकमुळे वॉर्नचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान वॉर्नच्या निधनानंतर तीन दिवसांनी अॅम्ब्युलन्सजवळ दिसलेली एक महिला चर्चेत आली. 

ही महिला नेमकी कोण होती याबाबत थायलंड पोलीस चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला शेन वॉर्नची मोठी चाहती आहे. या महिलेला वॉर्नचं पार्थिव घेऊन जाणाऱ्या अॅम्ब्युलन्सच्या आत जाण्याची परवानगी देण्यात आली होती. 

News.com.au च्या रिपोर्टनुसार, ही गोष्ट वॉर्नच्या पार्थिवासंदर्भातील सुरक्षेचं उल्लंघन करते. व्हिडिओ फुटेजमध्ये एक जर्मन महिला अॅम्ब्युलन्समध्ये शिरताना आणि व्हॅनमध्ये 40 सेकंद असल्याचं दिसतंय. तिच्या हातात फुलांचा गुच्छ देखील दिसतोय. या घटनेमुळे स्थानिक किंवा ऑस्ट्रेलियन पोलीस अधिकारी अॅम्ब्युलन्ससोबत नसतात असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातायत.

दरम्यान थायलंड पोलीसांनी या महिलेला विचारलं असता, ती कोह समुईमध्ये राहणारी वॉर्नची मोठी चाहती आहे. पोलिसांच्या रिपोर्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे, ही महिला वॉर्नला वैयक्तिकरित्या ओळखत होती. त्यामुळे त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी तिला परवानगी देण्यात आली.

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये खुलासा

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्नच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्याचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याची माहिती थायलंड पोलिसांनी दिली आहे. पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांचा अहवाल वॉर्नच्या कुटुंबीयांना आणि ऑस्ट्रेलियन दूतावासाला पाठवण्यात आला आहे, असं राष्ट्रीय पोलिस उपप्रवक्ता किसाना पठानाचारोन यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला याबद्दल त्याच्या कुटुंबीयांना कोणतीही शंका उपस्थित केलेली नाही असंही यात म्हटलं आहे.