मुंबई : इंग्लंडमध्ये होणारा ५० ओव्हरचा क्रिकेट वर्ल्ड कप आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. ३० मेपासून या वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजची टीम इतर सगळ्या टीमसाठी धोकादायक असल्याचं वक्तव्य वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ड्वॅन ब्राव्होनं केलं आहे. इंग्लंडची टीम ही सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातली वनडे सीरिज ही अत्यंत रोमांचक झाली. आयसीसीच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडला वेस्ट इंडिजमध्ये झगडावं लागलं. ५ मॅचची ही सीरिज २-२नं बरोबरीत सुटली. तर एक मॅच पावसामुळे रद्द झाली.
'सध्याच्या वेस्ट इंडिजच्या टीममध्ये सर्वाधिक युवा खेळाडू आहेत. ही आमची जमेची बाजू आहे. ते त्यांच्या खेळात सकारात्मक बदल करत आहेत. मला वाटतं की येत्या वर्ल्ड कप मध्ये वेस्ट इंडिजची टीम प्रतीस्पर्धी टीमला कडवी झुंज देईल' असेही डेव्हेन ब्राव्हो म्हणाला. तो म्हणाला की 'क्रिकेट क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी अनेक टीम दावेदार असल्याचे भाकीत केले आहे. पण अशा प्रकारे कोणत्याही टीमला वर्ल्ड कपसाठी दावेदार मानता येणार नाही.'
'कोणतीही टीम कोणत्याही परिस्थितीत चांगली कामगिरी करु शकते, याबद्दल शंका नाही. पण सद्यापरिस्थितीत वेस्ट इंडिजची टीम ही दमदार कामगिरी करत आहे. वेस्ट इंडिजच्या टीममध्ये युवा खेळाडूंसोबत अनुभवी खेळाडू देखील आहेत. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये इतर टीमपेक्षा वेस्ट इंडीजची टीम वरचढ ठरेल.' असे डेव्हेन ब्राव्होला वाटतं.
इंग्लडची टीम वेस्ट इंडिजमध्ये ३ टेस्ट, ५ वनडे आणि ३ टी-२० मॅचच्या दौऱ्यावर आहे. यातली टेस्ट सीरिज वेस्ट इंडिजने २-१ ने जिंकली. तर ५ वनडे मॅचची सीरिज २-२ ने बरोबरीत सुटली. तर एक मॅच पावसाच्या व्यत्ययामुळे होऊ शकली नाही. उद्यापासून (५ मार्च) तीन मॅचच्या टी-२० सीरिजला सुरुवात होत आहे.
वेस्ट इंडिजच्या टीममधील खेळाडूंची शरीरयष्टी ही इतर टीममधील खेळाडूंच्या तुलनेत उत्तम आहे. त्यांची उंची देखील जास्त असल्याने त्यांना मोठे फटके मारण्यासाठी सहज पडते. तसेच त्यांना त्यांच्या उंचीचा फिल्डींग करताना फायदा होतो. क्रिस गेलने वर्ल्ड कप नंतर निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले आहे. निवृत्ती जाहीर केल्यापासून गेल आधीपेक्षा अधिक प्रमाणात आक्रमक दिसत आहे.